(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा एकदा चिरे टाकून अडविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (१६ मार्च) दुपारच्या सुमारास उघडकीस आला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बौद्धवाडीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून, संबंधित प्रकारामागील व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावर मोठे चिरे टाकून मार्ग बंद करण्यात आल्याचे निदर्शनास येताच बौद्धवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. “जोपर्यंत पोलिस प्रशासन येत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही,” असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत रस्त्यातील चिरे बाजूला करून मार्ग पुन्हा मोकळा केला. मात्र हा प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वीही बौद्धवाडीच्या रस्त्यावर असाच प्रकार घडला होता. त्या वेळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संशयित व्यक्तींची नावेही पोलिसांना देण्यात आली होती. तरीदेखील कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यावेळी पुन्हा धाडसाने रस्ता रोखण्याचा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “त्या वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर आज पुन्हा ही वेळ आली नसती. हा केवळ रस्ता अडवण्याचा नव्हे, तर मुद्दाम त्रास देण्याचा प्रकार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया बौद्ध ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पाटील पवार मॅडम तसेच तलाठी कवाळे उपस्थित होते. आता या पुनरावृत्तीमागील सूत्रधार कोण, याचा छडा लावून पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलून कठोर कारवाई करावी, अशी मागणी बौद्धवाडीतील नागरिकांनी केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे
वारंवार सार्वजनिक मार्ग अडवून नागरिकांना त्रास देण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध स्थानिक पातळीवरील तपासातून लागत नसल्याने आता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी देखील मागणी पुढे येत आहे. हा केवळ रस्ता अडवण्याचा प्रश्न नसून परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रकरण गांभीर्याने घेत कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई झाली तरच अशा घटनांना आळा बसेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

