(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील पारंपरिक जीवनपद्धतीत शेती आणि गुरेढोरे हे परस्परपूरक घटक मानले जात असत. शेतकरी जीवनाचा अविभाज्य भाग असलेली गुरांची देखभाल, गोठ्यांची रचना आणि ऋतूनुसार बदलणारी व्यवस्था यांतून गावाकडच्या जगण्याचा स्वतंत्र ठसा उमटत असे. मात्र बदलत्या काळात शेतीचे घटते प्रमाण, आधुनिक साधनांचा वाढता वापर आणि जीवनशैलीतील बदल यामुळे ‘गुरांचा आवसा’ ही संकल्पना आता दुर्मिळ होत चालल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
पूर्वी जवळपास प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घराशेजारी गोठा असणे ही नित्याची बाब होती. पावसाळ्यात गुरे गोठ्यात बांधली जात; मात्र हिवाळ्यानंतर डिसेंबरपासून त्यांना मोकळ्या जागेत उभारलेल्या ‘आवसा’मध्ये ठेवण्याची पद्धत होती. झाडांच्या फांद्या, बांबू आणि स्थानिक साधनसामग्री वापरून उभारलेली ही तात्पुरती रचना चारही बाजूंनी संरक्षित असे. गुरांना बांधण्यासाठी गवाणी, वैरण साठवण्यासाठी वेगळी जागा आणि गवताच्या वरंडीसाठी काटेरी कुंपण अशी त्याची मांडणी केली जात असे.
आवसाच्या शेजारी शेणाच्या गोवऱ्या वाळवण्यासाठी माचाही तयार केलेली असे. शेतीसाठी आवश्यक असलेले गवत, वैरण आणि इतर साधने याच परिसरात ठेवली जात. गुरांना एकाच ठिकाणी दीर्घकाळ न ठेवता जागा बदलून ठेवण्याची ही पद्धत आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त मानली जात होती. पावसाळा जवळ आला की गुरांना पुन्हा गोठ्यात आणण्याची प्रथा होती. ऋतूनुसार बदलणाऱ्या या व्यवस्थेत ग्रामीण जीवनातील नियोजन, श्रमसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले जवळचे नाते स्पष्टपणे दिसून येत असे. मात्र गेल्या काही वर्षांत शेतीचे प्रमाण घटले, पारंपरिक शेतीवरून अनेक कुटुंबे इतर व्यवसायांकडे वळली आणि गुरे पाळण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी झाले. परिणामी, एकेकाळी प्रत्येक गावात सहज दिसणारा गुरांचा आवसा आता क्वचितच नजरेस पडतो.
ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेली ही रचना हळूहळू इतिहासजमा होत असून, बदलत्या ग्रामीण वास्तवात पारंपरिक जीवनशैलीच्या अनेक खुणा अदृश्य होत असल्याची खंत ज्येष्ठ ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

