(चिपळूण / प्रतिनिधी)
महाड चवदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन आंदोलन यांच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त १९ व २० मार्च रोजी महाड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जाती अंत संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च रोजी महाडजवळील लाडवली येथील बेटकर मठाच्या सभागृहात मानवी हक्क राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाड चवदार तळे सत्याग्रहाचे प्रमुख संघटक रामचंद्र बाबाजी मोरे यांच्या जन्मगावी ही परिषद होत असल्याने या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि वर्तमान जातीय वास्तव या मुद्यांवर आधारित चर्चासत्रांमुळे या परिषदेकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एम. ए. बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे, आंबेडकरी साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, लोकशाहीर संभाजी भगत तसेच पक्षाचे राज्य सचिव अजित नवले मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या उद्घाटन सत्रात रामचंद्र मोरे लिखित ‘महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘आजचे जात वास्तव आणि भारतीय संविधानासमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचा पुढील भाग २० मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मिरवणुकीने सुरू होणार असून, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सत्याग्रहींना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांद्वारे महाडच्या ऐतिहासिक संघर्षाची स्मृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार असून, सामाजिक न्यायाच्या लढ्याची परंपरा नव्याने अधोरेखित केली जाणार आहे.

