(रत्नागिरी)
शहरालगतच्या भाट्ये परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या इलेक्ट्रीक दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता, भाट्ये येथील नझीर उस्मान वाडकर यांच्या घरासमोर घडली.
अख्तर यासिन साखरकर (वय ३८, रा. नवानगर, भाट्ये) आपल्या एमएच-०८ एयू-९४७५ या दुचाकीवरून पत्नी वफा आणि मुलगा मोहम्मद यांना घेऊन फणसोपहून रत्नागिरीकडे येत होते. याच सुमारास समोरून येणारे प्रशिल सुनील साळवी आपल्या इलेक्ट्रीक दुचाकीवर (एमएच-०८ बीएफ-३२८५) जात होते. भाट्ये येथे पोहोचताच संशयित साखरकर यांने दुचाकीचा वेग नियंत्रणात न ठेवता प्रशिल साळवी यांच्या स्कूटरला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की प्रशिल साळवी रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात अख्तर साखरकर यांची पत्नी आणि मुलगाही किरकोळ जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी संशयित चालक अख्तर यासिन साखरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रत्नागिरी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

