(चिपळूण)
शहरालगतच्या परशुराम घाटात शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री गाडी अडवून तिघांना मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी क्रमांक चार मोईन सदाकत पेचकर याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी मोईन पेचकर यांच्यावतीने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. बोरकर यांनी मोईन पेचकर याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह १० जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह याच्यासह शाहिद सरगुरोह, फैजल मेमन, मोईन पेचकर, महमद खान, फहद खान, निहाल अलवारे, हनिफ रुमाने, मुजफर इनामदार, शडियाज दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद मुनावर अहमद बोट (वय ४२, रा. मेटे मोहल्ला असगणी, खेड) यांनी दिली आहे. मारहाणीत बोट यांच्यासह उस्मान इसप्न झगडे, महमद अली (दोघे, रा. असगणी) हे जखमी झाले आहेत. ५ डिसेंबर रोजी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथे जर्मिला शहा यांचा मुलगा तारीक याचा वाद झाल्याने त्याची माहिती जसिता यांनी त्याचा भाऊ साजिद याला दिली. या पार्श्वभूमीवर चिपळूणहून साजिद सरगुरोह याच्यासह शाहिद सरगुरोह हे तिथे गेले असता त्या ठिकाणी पुन्हा वाद झाला. त्यानुसार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मुनाबर बोट यांच्यासह उस्मान नई व महमद जाली हे ६ रोजी चिपळूण येथे आले होते.
मात्र, वाद न मिटल्याने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारने खेडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी साजिदसह दहाजण मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात थांबले होते. त्यांनी कार थांबवून मुनावर बोट, उस्मान झगडे, महमद अली यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये तिघांना दुखापत झाली. त्याचबरोबर कारच्या दोन्ही बाजूच्या काचाही फोडल्या. या प्रकरणात मोईन पेचकर याचा कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नाही. त्यांच्या हातात काठचा अथवा सळ्या आढळून आल्या नाहीत. शिवाय, दोन्ही बाजूकडून मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, असे युक्तिवाद वकील पेचकर यांनी उच्च न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मोईन पेचकर याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.