(जैतापूर / राजन लाड)
जैतापूरचा सुपुत्र आणि रंगभूमीवर आपली छाप सोडलेला सुनिल करगुटकर आता थेट बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या “फकीरियत” या हिंदी चित्रपटात सुनिलची भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड जपणाऱ्या सुनिलने वस्त्रहरण, रात्रीस खेळ चाले, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारख्या नाटकं आणि चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. आता त्याच्या अभिनय प्रवासात आणखी एक मोलाची भर पडत आहे.
फकीरियत हा आध्यात्मिक वाटचालीवर आधारित चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा अनुजा जानवलेकर यांच्या “चिरूट जलती है” व “अध्यात्म : एक विद्रोह, एक क्रांती” या पुस्तकांवर आधारलेली आहे. पटकथा व संवाद लेखन अनिल पवार यांनी अनुजा जानवलेकर यांच्या सहकार्याने केले आहे.
चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत दिसणार असून इतर कलाकारांमध्ये उदय टीकेकर, संदेश जाधव, विनित शर्मा, नयन जाधव, सुनिल करगुटकर, अक्षय वर्तक, नुपूर दुधवडकर यांचा समावेश आहे. विशेष भूमिकेत संतोष जुवेकर झळकणार आहे. छायाचित्रण अजित रेड्डी यांचे तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.
फकीरियत हा आध्यात्मिक शोध, व्यक्तीगत संघर्ष आणि आत्मविकास यांचा मागोवा घेणारा चित्रपट असून महावतार बाबाजींच्या शिकवणींवर आधारित कथा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. या संधीबद्दल सुनिल करगुटकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, जैतापूरच्या मातीतील हा कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

