(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील राजिवडा परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचे चित्रीकरण करत व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांना न्यायालयाने शनिवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुबेर सलीम शेख (२२) आणि मुस्तकीन गडकरी (२४, दोघेही रा. राजिवडा, रत्नागिरी) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी अल्पवयीन मुलाला भीतीच्या छायेखाली ठेवत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलगा मानसिक धक्क्यात असल्याने त्याने सुरुवातीला हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला होता. मात्र, आरोपींनी या अमानुष कृत्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याने प्रकरण उघडकीस आले.
गुरुवारी, १२ मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास संबंधित व्हिडिओ आला. व्हिडिओतील मुलगा स्वतःचा मुलगाच असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित हालचाल करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत असून, व्हिडिओच्या प्रसारामागील इतर पैलूंचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

