(संगमेश्वर / प्रतिनिधी)
भारतीय तत्त्वज्ञान, वेद आणि उपनिषदांचा सखोल अभ्यास करून त्यातील आध्यात्मिक विचारांना रंग, रेषा आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून कॅनव्हासवर साकार करणारी संगमेश्वरची युवा चित्रकर्त्री मनाली सैतवडेकर आज आपल्या स्वतंत्र चित्रशैलीमुळे कलाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत आहे. गूढ, रम्य आणि चिंतनशील आशय असलेल्या तिच्या कलाकृती रसिकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जात असून, राज्यभरातून त्यांना मोठी दाद मिळत आहे.
मूळची संगमेश्वरची असलेल्या मनालीचे बालपण वडिलांच्या नोकरीनिमित्त विविध ठिकाणी गेले. त्यामुळे तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वेगवेगळ्या शाळांमध्ये झाले. नववीत असताना तिने संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. याच काळात तिची कला विषयाशी ओळख झाली आणि याच क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्धार तिने केला.
पुढील शिक्षणासाठी सांगली येथे गेल्यानंतर कुटुंबाची इच्छा वाणिज्य शाखेत शिक्षण घेण्याची होती. मात्र मनालीने आपल्या आवडीचा मार्ग निवडत सांगली येथील कला विश्व महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे चार वर्षे विविध चित्रशैली, नामवंत कलाकारांची कामे आणि कलादृष्टीचा सखोल अभ्यास करत तिने स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली.
रेखा आणि रंगकला विषयातील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर मनालीने स्वतंत्रपणे कलासाधना सुरू केली. त्यानंतर तिचा विवाह कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या सचिन यांच्याशी झाला. दोघांनी मिळून ‘सुखम’ या नावाने स्टुडिओची स्थापना करत कलाविश्वात नवा उपक्रम सुरू केला.
‘सुखम’च्या माध्यमातून राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन, प्रात्यक्षिके, कार्यशाळा, विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात कला साहित्य उपलब्ध करून देणे तसेच नामवंत चित्रकारांच्या मुलाखतींचे प्रसारण अशा विविध उपक्रमांद्वारे कला प्रसाराचे कार्यही ते सातत्याने करत आहेत.
स्टुडिओमध्ये काम करत असताना मनालीने वेद आणि उपनिषदांचा सखोल अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून भारतीय तत्त्वज्ञानातील अनेक संकल्पना चित्रांमधून प्रभावीपणे व्यक्त करता येतील, याची तिला जाणीव झाली. त्यातूनच गूढ, रम्य, आध्यात्मिक आणि चिंतनशील आशय असलेल्या कलाकृतींची निर्मिती सुरू झाली. तिची चित्रे पाहताना प्रत्येक रसिकाला आपल्या कल्पनाविश्वात हरवून जाण्याचा अनुभव मिळतो.
मनालीच्या या वेगळ्या चित्रशैलीला अल्पावधीतच कला रसिकांची मोठी पसंती मिळाली. अनेक चित्रसंग्राहक, डॉक्टर, उद्योजक आणि कला प्रेमींनी तिच्या कलाकृती आपल्या घरात, कार्यालयात, दवाखान्यात आणि संस्थांमध्ये स्थान दिले आहे.
सतत नवनवीन प्रयोग करत स्वतःच्या प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी नवीन शिकण्याचा ध्यास घेतलेल्या मनालीने आजवर असंख्य चित्रांची निर्मिती केली आहे. तिची मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सांगलीसह विविध शहरांमध्ये सात वैयक्तिक चित्रप्रदर्शने भरली असून, नऊ समूह चित्रप्रदर्शनांमध्ये तिने सहभाग नोंदवला आहे.
अत्यंत कमी वयात स्वतःची स्वतंत्र कलाशैली विकसित करून मनाली सैतवडेकर यांनी कलाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगमेश्वरच्या या कन्येच्या यशस्वी वाटचालीचा परिसरातील नागरिकांना अभिमान वाटत असून, आगामी काळात तिच्या कलाकृती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचतील, असा विश्वास कला रसिक व्यक्त करत आहेत.

