(नवी दिल्ली)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे विमान पालम विमानतळावर उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आलिंगन दिले. स्वागतानंतर दोन्ही नेते एकाच वाहनातून पुढील कार्यक्रमांसाठी रवाना झाले. 2022 मध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर पुतिनांचा हा पहिलाच भारत दौरा असून आंतरराष्ट्रीय राजनैतिक दृष्टीने ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
व्लादिमीर पुतिन हे परदेश दौऱ्यावर नेहमी रशियन बनावटीच्या Aurus Senat Limousine या विशेष सुरक्षायुक्त वाहनातून प्रवास करताना दिसतात. भारत दौऱ्यासाठीही ते हीच गाडी आणतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, दिल्ली विमानतळावर आगमनानंतर एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. त्यांनी रशियातून एअरलिफ्ट करून आणलेली आपली ऑरस सीनेट कार सोडली आणि मुंबई पासिंग असलेल्या एमएच ०१ पासिंग असलेल्या टोयोटा कंपनीच्या गाडीतून पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी एकत्र प्रवास केला.

भारत आणि रशिया यांच्यातील वाढत्या सहकार्याचा उद्देश अमेरिकेसह कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करणे हा अजिबात नाही, असे स्पष्ट विधान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले आहे. भारत–रशिया संबंधांबाबत अमेरिकेतून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि नवीन टॅरिफ धोरणांवर पुतिनांनी क्रेमलिनमध्ये दिलेल्या मुलाखतीत विस्तृत स्पष्टीकरण दिले.
भारत आणि रशिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ-चालित धोरणांना’ कसे हाताळत आहेत, असा प्रश्न विचारला असता पुतिन म्हणाले की, “प्रत्येक देशाला त्याचं आर्थिक धोरण स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे. आम्ही कधीही आमच्या सहकार्याचा वापर कोणाविरुद्धही केला नाही, आणि भविष्यातही करणार नाही.”
टॅरिफ धोरणांवर पुतिन यांचे भाष्य
पुतिन यांनी अमेरिकेच्या अतिरिक्त शुल्क लादणाऱ्या धोरणांकडे लक्ष वेधत सांगितले की, “त्यांच्या तज्ञांना वाटते की अशा उपायांनी अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होते. पण आमच्या तज्ञांच्या मते या पद्धतींमध्ये गंभीर धोके आहेत. जगातील व्यापार WTO च्या नियमांनुसार चालायला हवा.”
‘मेक इन इंडिया–मेक विथ रशिया’ उपक्रमावर प्रतिक्रिया
“मेक इन इंडिया, मेक विथ रशिया” यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कशी प्रतिक्रिया देतील, असा प्रश्न विचारला असता पुतिन म्हणाले—
“पंतप्रधान मोदी आणि मी कधीही बाह्य दबावाखाली, एखाद्या देशाविरुद्ध काम करण्याचा प्रयत्न केला नाही. आमचे सहकार्य केवळ परस्पर हितावर आधारित आहे.”
रशियन तेल खरेदी करणं “युद्धाला निधी पुरवण्यासारखं आहे” या ट्रम्प यांच्या विधानावर टिप्पणी करताना पुतिन म्हणाले—
“मी वैयक्तिक टिप्पणी करत नाही. ते त्यांच्या देशाच्या धोरणांबद्दल जबाबदार आहेत, आणि त्याबद्दल मत व्यक्त करण्याचा अधिकार त्यांच्या नागरिकांना आहे. भारत रशियाकडून ऊर्जा खरेदी करतो हे जगजाहीर आहे. पण अमेरिका देखील आपल्या अणुउर्जा प्रकल्पांसाठी रशियन अणुइंधन खरेदी करत आहे. त्यामुळे भारताला हा अधिकार का नसावा? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.” पुतिन यांनी हेही सांगितले की, रशिया या विषयावर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चेला तयार आहे.

