(जैतापूर / राजन लाड)
नाटे पोलीस ठाण्याने अलीकडच्या काळात विविध आघाड्यांवर प्रभावी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करून जिल्हा पोलीस दलात स्वतःची सक्षम ओळख निर्माण केली आहे. गुन्हे उकल, प्रशासकीय शिस्त, तांत्रिक कामकाज आणि नागरिकाभिमुख सेवा या सर्व क्षेत्रांत ठाण्याने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या सर्व कामगिरीचा गौरव म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते नाटे पोलीस ठाण्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
नाटे पोलीस ठाण्याने स्मार्ट सिटी पोलीस ठाणे म्हणून ISO मानांकन प्राप्त केले आहे. आधुनिक सुविधा, डिजिटल व्यवस्थापन, तांत्रिक नियंत्रण आणि पारदर्शक सेवा पद्धती यांचा प्रभावी वापर करून ठाण्याने जिल्ह्यातील कामगिरीत विशेष स्थान प्राप्त केले आहे. गुन्हे तपासातही नाटे पोलीस ठाण्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
- गु.र. क्र. 74/2025 (BNS 303(2)) प्रकरणात ₹1,47,000 किमतीचा मुद्देमाल पुण्यातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक माहितीचा योग्य वापर, अचूक तपास आणि तातडीच्या कारवाईमुळे हा गुन्हा अल्पावधीत उकलण्यात आला.
- गु.र. क्र. 75/2025 (BNS 305(ड), 324(3), 331(2)) या घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ 12 तासांत उकल करून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या उल्लेखनीय तपासासाठी सपोनी प्रमोद वाघ यांना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तांत्रिक कामकाजाच्या बाबतीतही नाटे पोलीस ठाण्याने उच्च दर्जाची कामगिरी बजावली आहे. CCTNS प्रणालीमध्ये जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान ठाण्याला मिळाला आहे. CCTNS विभागाचे काम प्रभावीपणे सांभाळल्याबद्दल अंमलदार सुप्रिया बांदकर यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या सर्व यशस्वी कामगिरीमुळे नाटे पोलीस ठाण्याविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सातत्यपूर्ण प्रगती, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवेमुळे नाटे पोलीस ठाणे जिल्ह्यातील आदर्श ठाणे म्हणून पुढे आले आहे.

