(मुंबई)
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका किंवा अर्जात चुकीचे पर्याय निवडल्यामुळे ज्या महिलांचा हप्ता बंद झाला आहे, त्यांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत विशेष संधी देण्यात आली आहे.
ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी लाभ घेतला असला तरी काही प्रकरणांमध्ये तांत्रिक त्रुटी आणि चुकीची माहिती भरल्यामुळे पात्र महिलांची नावे योजनेतून वगळली गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यभरात अनेक महिलांचे दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अनुदान थांबले होते.
दरम्यान, या संदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत सत्यजीत तांबे यांनी हजारो महिलांना चुकीच्या तांत्रिक माहितीमुळे अपात्र ठरवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, अनेक महिलांची नावे कोणतीही पूर्वसूचना न देता योजनेतून वगळण्यात आली. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता संगणकीय प्रणालीमध्ये निष्काळजीपणे माहिती नोंदवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
तांबे यांनी असेही नमूद केले की, अनेक गरीब आणि गरजू महिलांच्या नावापुढे चुकीने ‘शासकीय नोकरी’ असा शेरा लावण्यात आला. त्यामुळे त्या महिलांना मिळणारा आर्थिक लाभ थांबला. ई-केवायसी प्रक्रियेतही अनेक महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ग्रामीण भागात महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रश्नावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, अर्ज भरताना अनवधानाने चुकीचे पर्याय निवडल्यामुळे ज्या पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत, त्यांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत एक वेळची विशेष मुदत देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांना त्यांचे अर्ज पुन्हा दुरुस्त करून योजनेत समाविष्ट होता येणार आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेल्या अर्जांवरही शासन सकारात्मक भूमिका घेत असून प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, ज्या पात्र महिलांचे 1500 रुपयांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत, त्यांची फेरपडताळणी करून त्यांना लवकरच लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासन या विषयावर सकारात्मक असून वंचित राहिलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

