(मुंबई)
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता देशांतर्गत बाजारावरही दिसू लागला आहे. इंधन टंचाई आणि संभाव्य दरवाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिक तसेच हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी साधनांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे बाजारात इंडक्शन शेगड्या, त्यासाठीची भांडी आणि कोळसा शेगड्यांची अचानक मागणी वाढली असून विक्रेत्यांना चांगलीच चलती आली आहे.
युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी पुढील काही महिन्यांत महागाई वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. काही ठिकाणी इंधनाचा काळाबाजार सुरू झाल्याच्या चर्चांमुळे नागरिकांनी आधीच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
नेहमीच्या गॅस दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या अनेक कुटुंबांनी आता गॅस शेगडीऐवजी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्या आणि त्यासाठी लागणारी भांडी खरेदी करण्याकडे कल दर्शवला आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती भांड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
हॉटेल व्यवसायिकांनी देखील मोठ्या क्षमतेच्या व्यावसायिक इंडक्शन शेगड्या, कुकर आणि मोठ्या भांड्यांच्या खरेदीला सुरुवात केली आहे. मागणी अचानक वाढल्यामुळे बाजारात अधिक प्रकारचा माल मागवावा लागत असल्याचे व्यापारी योगेश मेहता यांनी सांगितले.
दरम्यान, चहा विक्रेते आणि दिवसभर शेगडी सुरू ठेवणारे लहान व्यावसायिकांनी कोळशाच्या शेगड्यांचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे कोळसा आणि कोळसा शेगड्यांची मागणीही वाढली आहे. युद्धापूर्वी ३० ते ४० रुपये किलो दराने मिळणारा कोळसा आता ५ ते ७ रुपयांनी महाग झाला आहे. मात्र या पर्यायांनाही काही मर्यादा आहेत. कोळसा शेगड्यांमुळे धूर आणि प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. तसेच भांड्यांवर काळा मळ बसल्याने स्वच्छतेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. दुसरीकडे इंडक्शन शेगडी पर्यावरणपूरक पर्याय असला तरी विजेचा वापर वाढल्यास वीजबिलावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
एकूणच, इंधन टंचाई आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यायी साधनांचा अवलंब सुरू केला असला तरी अखेरीस त्याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.
इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताना या 3 गोष्टी नक्की तपासा
सध्या अनियमित गॅस आणि वाढत्या दरांमुळे अनेक घरांमध्ये इंडक्शन स्टोव्हचा वापर वाढताना दिसत आहे. बाजारात विविध कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या किमतीचे अनेक मॉडेल उपलब्ध असल्यामुळे खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी तपासणे गरजेचे ठरते. योग्य माहिती घेतल्यास योग्य मॉडेल निवडणे सोपे होते आणि पुढील खर्चही टाळता येतो.
पॉवर रेटिंग आणि कुकिंग मोड तपासणे आवश्यक
इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताना सर्वप्रथम त्याचे पॉवर रेटिंग पाहणे महत्त्वाचे असते. बाजारात साधारणपणे 1200 वॅट ते 2200 वॅटपर्यंत क्षमतेचे इंडक्शन स्टोव्ह उपलब्ध असतात. जास्त पॉवर असलेले मॉडेल पदार्थ जलद शिजवण्यास मदत करतात. मात्र त्यामध्ये विजेचा वापरही तुलनेने अधिक होऊ शकतो.
म्हणूनच रोजच्या वापरानुसार योग्य पॉवर असलेले इंडक्शन निवडणे आवश्यक आहे. अनेक आधुनिक मॉडेलमध्ये उकळणे, फ्राय करणे, स्लो कुकिंग यांसारखे वेगवेगळे कुकिंग मोड दिलेले असतात. या सुविधांमुळे स्वयंपाक सोपा होतो आणि वीज वापरावरही नियंत्रण ठेवता येते. इंडक्शन खरेदी करण्यापूर्वी घरातील वीज कनेक्शन त्या पॉवरसाठी योग्य आहे का, हेही तपासणे गरजेचे आहे.
प्रत्येक भांडे इंडक्शनवर वापरता येत नाही
इंडक्शन स्टोव्ह मॅग्नेटिक बेस तंत्रज्ञानावर कार्य करतो. त्यामुळे सर्व प्रकारची भांडी त्यावर वापरता येत नाहीत. स्टील किंवा आयर्न बेस असलेली भांडी इंडक्शनवर चांगली तापतात. अनेक वेळा ॲल्युमिनियम किंवा साधी भांडी इंडक्शनवर काम करत नाहीत. त्यामुळे नवीन इंडक्शन घेण्यापूर्वी घरातील भांडी त्यावर वापरता येतील का, हे तपासणे योग्य ठरते. गरज असल्यास इंडक्शन बेस असलेली भांडी वेगळी खरेदी करावी लागू शकतात.
सेफ्टी फीचर्स आणि ब्रँडची खात्री करा
सध्याच्या इंडक्शन स्टोव्हमध्ये अनेक आधुनिक सुरक्षा सुविधा दिलेल्या असतात. ऑटो कट-ऑफ, ओव्हरहीट प्रोटेक्शन आणि चाइल्ड लॉक यांसारख्या फीचर्समुळे वापर अधिक सुरक्षित होतो. इंडक्शन जास्त गरम झाल्यास किंवा योग्य भांडे न ठेवल्यास ते आपोआप बंद होते. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. याशिवाय इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताना ब्रँड, वॉरंटी आणि सर्व्हिस सपोर्टची माहिती तपासणेही महत्त्वाचे असते. विश्वासार्ह कंपनीचे उपकरण किंमतीने थोडे महाग असले तरी ते अधिक टिकाऊ आणि सुरक्षित ठरते.

