( पुणे )
राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा 21 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Maharashtra State Council of Examination (MSCE) ने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, उमेदवारांना 27 मार्च ते 16 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी ही माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्ज केवळ इंग्रजी भाषेतच भरावा लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उमेदवारांना 9 जून ते 21 जून या कालावधीत प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा 21 जून रोजी दोन सत्रांमध्ये होणार आहे. पेपर क्रमांक 1 (प्राथमिक स्तर) सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेत होईल, तर पेपर क्रमांक 2 (उच्च प्राथमिक स्तर) दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतला जाईल.
दोन्ही स्तरांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एकाच वेळी ‘प्राथमिक’ आणि ‘उच्च प्राथमिक’ असा पर्याय निवडावा, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. यामुळे उमेदवारांची परीक्षा केंद्रे एकाच ठिकाणी देणे सुलभ होणार आहे. परीक्षेशी संबंधित सविस्तर माहिती, अभ्यासक्रम आणि शासन निर्णय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

