(सातारा)
जागतिक वारसास्थळाचा मान मिळालेल्या कास पठारावर पुन्हा एकदा निसर्गाने रंगांची उधळण सुरु केली आहे. यंदाच्या कास फुलोत्सवाला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटन सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी वन विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या असल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन : फुलोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वनविभाग आणि कास कार्यकारी समितीने विशेष नियोजन केले आहे. कास पठारावरून अंधारी–कोळघर–सह्याद्रीनगरमार्गे मेढा–सातारा किंवा घाटाईमार्गे सातारा अशा एकेरी वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले असून, पर्यटकांनी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक पर्यटन : यंदा फुलोत्सवात पर्यावरणपूरक व जबाबदार पर्यटनावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी सजवलेल्या बैलगाड्या व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. तसेच पर्यटकांसाठी पाणीपुरवठा, पार्किंगची सुविधा आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे.
ऑनलाईन बुकिंग अनिवार्य : गैरसोय टाळण्यासाठी पर्यटकांनी आगाऊ ऑनलाईन बुकिंग करूनच कास पठारावर यावे, असे आवाहन वन समितीने केले आहे. एका दिवसासाठी जास्तीत जास्त ३ हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असून, सकाळी ७ ते ११, ११ ते ३ आणि ३ ते ६ अशा तीन टप्प्यांत पर्यटकांना सोडण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करून गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
फुलांचा बहर : पठारावर सध्या तेरडा, चवर, गेंद, सीतेची आसवे, नीलिमा, आभाळी, भारंगी या फुलांना विशेष बहर आला आहे. याशिवाय टोपली आणि कारवी या फुलांची तुरळक फुलेही पर्यटकांना पाहायला मिळत आहेत.

