(रत्नागिरी)
गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये सातत्याने श्रावण महिन्यात श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे रत्नागिरीत मंडळाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. यंदाच्या कीर्तन सप्ताहाचे हे १४ वे वर्ष आहे. यावेळचा कीर्तन सप्ताह वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. मंडळाच्या सभागृहात शुक्रवार २५ जुलै रोजी या सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पुढचे सलग सहा दिवस देवरूख, चिपळूण, राजापूर, पावस, गुहागर व लांजा या गावी कीर्तने होणार आहे.
सप्ताहाची सुरवात श्रावण शुध्द प्रतिपदा म्हणजेच शुक्रवार दि. २५ जुलैला सायंकाळी ५ वाजता ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. गोवा येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. डॉ. सौ. उर्वी बर्वे यांच्या कीर्तनाने कीर्तन सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. उर्वी बर्वे या बीएएमएस पदवीप्राप्त असून गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये कीर्तने सादर केली आहेत. त्यांना ऑर्गन श्रीधर पाटणकर व तबलासाथ स्वरूप नेने करतील.
शनिवार दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता अभिरुची देवरूख व श्री गणेश वेद पाठशाळा, देवरूख या संस्थांच्या सहकार्याने श्री गणेश वेद पाठशाळेच्या कात्रे – चांदोरकर सभागृहात ह.भ.प. सौ. नम्रता व्यास- निमकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यांचे कीर्तनाचे शिक्षण नारद मंदिर येथे झाले असून कीर्तनशास्त्रात बीए व एसएनडीटी विद्यापीठातून संगीतात एमए केले आहे. त्यांना ऑर्गन आशिष प्रभुदेसाई व तबलासाथ अभिजीत भालेकर करतील. रविवार दि. २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण यांच्या सहकार्याने ब्राह्मण सहाय्यक संघाच्या बेडेकर सभागृहात ह.भ.प. सौ. नम्रता व्यास- निमकर (पुणे) यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना ऑर्गन वरद केळकर आणि तबलासाथ प्रथमेश देवधर करतील.
सोमवार दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता राजापुरातील कीर्तन प्रेमी ग्रुप व संभाजी पेठ मित्रमंडळाच्या सहकार्याने श्री विठ्ठल मंदिरात ह.भ.प. प्रशांत धोंड यांचे कीर्तन होणार आहे. श्री. धोंड हे माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, संगीत विशारद, कीर्तनकार, गायक, अभिनेता आहेत. त्यांना ऑर्गन आकाश लेले आणि तबलासाथ आर्यन कुशे करतील.
मंगळवार दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता आबा चिपळूणकर आणि मंडळी यांच्या सहकार्याने पावसच्या श्रीराम मंदिरात येथे ह.भ.प. सौ. निला कुलकर्णी यांचे कीर्तन होणार आहे. त्यांनी रिझर्व्ह बॅंकेत अनेक वर्षे नोकरी केली. कीर्तनाचे प्रशिक्षण घेतले व विविध ठिकाणी कीर्तने करत आहेत. त्यांना ऑर्गन आकाश लेले आणि तबलासाथ वरद जोशी करतील.
बुधवार दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गुहागरच्या श्री व्याडेश्वर देवस्थानच्या सहकार्यातून देवस्थान सभागृहात ह.भ.प. मंदार गोखले यांचे कीर्तन होणार आहे. मंदार गोखले यांनी कीर्तनाचे शिक्षण घेऊन १४ वर्षे सेवाभावाने कार्यरत आहेत. तालभूषण, कीर्तनमधुकर या मानाच्या पदव्या प्राप्त आहेत. त्यांना ऑर्गन चिन्मय सावरकर आणि तबलासाथ प्रकाश तांबे करणार आहेत. गुरुवार दि. ३१ जुलैला सायंकाळी ६ वाजता लांजा येथील ब्राह्मण सहाय्यक सेवा मंडळाच्या सहकार्याने माऊली सभागृहात ह.भ.प. मंदार गोखले यांचे कीर्तन होईल. त्यांना ऑर्गन जगन्नाथ बेर्डे आणि तबलासाथ प्रदीप सरदेसाई करतील.
या सर्व ठिकाणच्या कीर्तनप्रेमी श्रोत्यांनी श्रावण कीर्तन सप्ताहातील कीर्तनांना उपस्थित राहून कीर्तन भक्तीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सर्व ठिकाणच्या सहयोगी संस्थांनी केले आहे.