(साखरपा / भरत माने)
कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पंचक्रोशीतील भोवडे गावातही शिमगोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गावातील ग्रामस्थ आणि चाकरमानी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत असून पारंपरिक संस्कृतीचे जतन केले जात आहे.
शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात पारंपरिक खेळे, पालखी नाचविणे, नमन, गोमू नाच आदी कार्यक्रम उत्साहात साजरे होत आहेत. ग्रामदैवतांची पालखी गावातील प्रत्येक घरापर्यंत भक्तांच्या भेटीसाठी नेली जात असून भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी श्री देव बोरेश्वर, श्री देव गांगेश्वर, देवी उदगीरी, देवी विठ्ठलाई, देवी काळंबा आणि देवी मानाई यांच्या पालख्या गावातील घराघरांत जाऊन भक्तांना दर्शन देत आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उत्सवाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी तुषार बाईंग, मुरलीधर बाईंग, काशीनाथ बाईंग, सुरेश बाईंग, रावजी बाईंग यांच्यासह अनेक ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. पालखी नाचविण्यासाठीही गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिमगोत्सवामुळे भोवडे गाव सध्या सणाच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.

