(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी रात्री धामणी रेल्वे स्टेशनजवळ खासगी लक्झरी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून बसमधील २३ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. बस थेट रस्त्यालगतच्या दरडीवर जाऊन आदळल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्रमांक एमएच ०८ बीसी २०३५ ही धामणी रेल्वे स्टेशनकडून संगमेश्वरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी विजयदुर्गहून मुंबईकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच ०१ ईएल ५४९५ ही २३ प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होती. समोरून येणाऱ्या रिक्षेला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा ताबा सुटला आणि बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उतरून थेट दरडीवर आदळून थांबली.
सुदैवाने बस खोल दरीत कोसळली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली. बसचा मुख्य दरवाजा उघडता न आल्याने स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आपत्कालीन दरवाजातून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
या अपघातात रिक्षाचालक अभिजित संजय गमरे आणि प्रवासी कुणाल सुरेंद्र कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रक्ताचे सडे पडले होते, यावरून धडकेची तीव्रता स्पष्ट होत होती. जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
दरम्यान, या अपघातानंतर महामार्गाच्या कामकाजावरून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्रीच्या वेळी स्पष्ट दिशादर्शक फलक आणि डायव्हर्जन बोर्ड नसल्यामुळे चालकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करण्यात आला.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याआधी पत्रकार वहाब दळवी आणि राजू पटेल यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. बस चालक मुस्तफा राजासाब गारमपल्ली हाही या दुर्घटनेत थोडक्यात बचावला असून संगमेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत.

