(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्थेच्या वतीने तसेच स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्याने “पाचल पंचक्रोशी चषक २०२६” या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ मे २०२६ रोजी पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे होणार असून पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी आणि तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेला पाचल पंचक्रोशी परिसरातील समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ३००० रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला २५,००० रुपये आणि आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला १५,००० रुपये आणि चषक, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला १०,००० रुपये आणि चषक देण्यात येणार आहेत.
याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात मालिकावीराला चषक आणि बॅट, उत्कृष्ट फलंदाजाला चषक व स्मार्ट वॉच, उत्कृष्ट गोलंदाजाला चषक व शूज, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला चषक व शूज देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये पाचल पंचक्रोशी विभागातील धनगर समाजातील संघांचा सहभाग असणार असून स्पर्धा गाव मर्यादित स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांसह काही वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत. प्रथम नोंदणी करणाऱ्या ९ संघांना स्पर्धेत सहभागी होण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील तरुणांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देण्याबरोबरच समाजात एकजूट आणि मैत्रीचे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
क्रिकेट स्पर्धा ही केवळ खेळापुरती मर्यादित नसून समाजातील ऐक्य आणि बंधुभावाचे प्रतीक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. त्यामुळे या उपक्रमाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुधीर कोकरे (मो. ९६५५६६८७४९) आणि संदेश रेडिज (मो. ९८०४३२९३७०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

