(रत्नागिरी)
शहरातील जयस्तंभ येथील स्टेट बँकेच्या नजिक खारेघाट रोडवरील शकुंतला अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने तब्बल ५९,८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (३१ जुलै) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी सीमा सुनिल साळवी (वय ६५, सेवा निवृत्त) या आपल्या राहत्या घरी नसताना चोरट्याने त्यांच्या घराचा दर्शनी दरवाजा कडीकोयंडा उचकटून उघडला आणि बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉवर फोडून सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २०,८०० रुपये रोख रक्कम आणि ४ हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू यामध्ये ग्लास, समई, पळी, उदबत्ती स्टॅण्ड, चांदीची नाणी आणि निरंजन असा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे फिर्यादी यांच्या नणंदेच्या खोलीतील लोखंडी कपाटातील चांदीच्या वस्तूंचाही समावेश चोरट्यांनी केलेल्या चोरीत आहे. ही घटना सकाळी ९.३० वाजेपासून ११.२१ वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, आय तपासणीसाठी फिर्यादी बाहेर गेलेल्या संधीचा फायदा घेत चोरट्याने ही संपूर्ण कारगुजार केली.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. माईनकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या चोरी प्रकरणाबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१(३) व ३०५(ठ्ठ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रत्नागिरी शहरात घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.