(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रत्नागिरी पोलिसांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित ‘RAIDS’ ॲपच्या मदतीने एकीकडे हरवलेल्या व्यक्तीचा शोध लावण्यात यश आले, तर दुसरीकडे दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १९६/२०२२ मधील फरार आरोपीचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपीचे २०२२ मधील छायाचित्र ‘RAIDS’ ॲपमध्ये अपलोड करून विविध स्वरूपात फेस रीकन्स्ट्रक्शन करण्यात आले. या पुनर्रचित प्रतिमांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सखोल तपास यांचा संगम साधत शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर या प्रयत्नांना यश मिळत आरोपीला राजस्थानमधील जोधपूर येथून अटक करण्यात आली. याच दरम्यान, पूर्णगड पोलीस ठाण्यात ७ एप्रिल २०२६ रोजी हरवलेल्या व्यक्तीची तक्रार दाखल झाली होती. त्या व्यक्तीचा फोटो ‘RAIDS’ ॲपमध्ये अपलोड करून फेस रीकन्स्ट्रक्शनद्वारे तयार करण्यात आलेले छायाचित्र जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच संबंधित व्हॉट्सॲप गटांमध्ये प्रसारित करण्यात आले. या तंत्रज्ञानाधारित जलद समन्वयामुळे हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यातही पोलिसांना यश मिळाले.
दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. फरार आरोपीच्या अटकेची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने, तर हरवलेल्या व्यक्तीच्या शोधाची मोहीम सहायक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक व परिणामकारक वापर, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची समन्वयित कार्यपद्धती यामुळे गुन्हे उकलण्याचा वेग लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे या दुहेरी यशातून स्पष्ट झाले आहे.

