(मुंबई)
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या चार प्रवाशांना अंबरनाथ फास्ट लोकलने जोरदार धडक दिली, यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
संध्याकाळची वेळ होती. अंधार पडला होता. ठप्प झालेली रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली होती. पण रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या त्या व्यक्तींना त्याबाबत माहिती नव्हतं. अचानक एक भरधाव फास्ट लोकल ट्रेन आली आणि तीन ते चार प्रवाशांना या लोकल ट्रेनने धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. जखमी प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे काही काळ स्थानिक रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवासी रुळावरून पायी चालत जाण्यास निघाले होते. त्याच दरम्यान हा अपघात घडला.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले की, “प्रवाशांना आम्ही वारंवार विनंती करतो की, कृपया रेल्वे ट्रॅक ओलांडू नका. या घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे. मृत आणि जखमी व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.”
प्रवाशांना ट्रॅक ओलांडण्याचे टाळावे, सुरक्षित मार्गांचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

