(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यात काही वर्षांपूर्वी गाजलेल्या शिकारीप्रकरणी सात जणांची अखेर राजापूर न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल दि. ६ मार्च २०२६ रोजी देण्यात आला. सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या हद्दीतील तिवरे फाटा येथे गस्ती दरम्यान शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी संदीप हळदणकर, विक्रम पोकडे, महेश पोकडे, स्वरूप तोडणकर, किरण पोकडे, प्रशांत पोकडे व राजेश तरळ या सात जणांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ (१), २५ अन्वये गुन्हा क्रमांक १८७/२०२१ नोंदविला होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेले वाहन, १२ बोअर बंदूक, सर्च लाईटसह अन्य मुद्देमाल जप्त केला होता. सखोल तपास पूर्ण केल्यानंतर सागरी पोलीस ठाणे नाटेचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी संबंधित सातही आरोपींविरुद्ध राजापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲड आदेश चवंडे आणि ॲड. समीर कुंटे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. या युक्तिवादाचा विचार करून राजापूर न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती हाके यांनी पुराव्याअभावी संदीप हळदणकर, विक्रम पोकडे, महेश पोकडे, स्वरूप तोडणकर, किरण पोकडे, प्रशांत पोकडे आणि राजेश तरळ या सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिला.

