(चिपळूण)
तालुक्यातील मुंढे–सावंतवाडी येथे २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ऐन तरुण वयात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश सुदेश सावंत (वय २३, रा. मुंढे–सावंतवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दीपेश याने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला कापडाच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे सांगितले जात आहे.
घरातील सदस्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत दीपेश याचा मृत्यू झाला होता. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अलोरे शिरगाव पोलीस स्थानक येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाची पोलीस दप्तरी रविवारी सायंकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी नोंद करण्यात आली. या संदर्भात कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

