( संगमेश्वर / प्रतिनिधी )
तबले आणि नाल भरण्याचा वडिलांचा परंपरागत व्यवसाय चालवण्यासाठी सूर आणि स्वरांचं ज्ञान नव्हतं. याबरोबरच या एकाच व्यवसायातून कुटुंब चालवणं अवघड होतं. या सर्वाचा सारासार विचार करून वेगळी वाट शोधणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब फेपडेवाडी येथील संदेश बगाराम लिंगायत यांनी आपल्या घराजवळील जागेत भाजीपाला आणि कडधान्य लागवडीतून भरघोस उत्पादन घेता येते, असा संदेश आजच्या तरुण पिढीला दिला आहे. यासाठी आपल्याजवळ जिद्द, चिकाटी आणि व्यावसायिक ज्ञान असेल तर आपण गावात राहूनच आपला विकास करू शकतो याचं उत्तम उदाहरण लिंगायत यांनी समाजासमोर ठेवलं आहे.
संदेश बगाराम लिंगायत यांच्या वडिलांचा संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथे नाल तबला आणि ढोलकी भरण्याचा व्यवसाय होता. खरंतर ग्रामीण भागात पुढील पिढीकडून पारंपारिक व्यवसाय चालवण्यावरच भर दिला जातो. संदेश यांना सुरांचं आणि स्वरांचे आवश्यक तेवढं ज्ञान नसल्याने त्यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचं टाळलं. बारावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या संदेश यांनी साडवली येथील वनाझ इंजीनियरिंग मध्ये सहा महिने नोकरी केली. या नोकरीनंतर त्यांनी देवरुख येथील सिद्धी ट्रस्ट मध्ये बचत गट आणि शेतकरी मार्गदर्शन, लागवड यामध्ये सलग आठ वर्षे काम केलं. यातूनच त्यांना स्वतःला देखील लागवड करण्याची आवड निर्माण झाली.
सन २००६ मध्ये संदेश लिंगायत यांनी सह्याद्री नगर देवरुख येथील सुधीर गावडे यांच्या कुक्कुट खाद्य विक्री व्यवसायात नोकरी पत्करली. ही नोकरी करत असतानाच बर्ड फ्लू आल्याने गावडे यांनी हा व्यवसाय कालांतराने बंद केला. मात्र त्यांनी आपल्याकडील कामगारांना नवीन बाग तयार करणे, लागवड करणे, बागेची देखभाल करणे अशा कामांचे प्रशिक्षण दिले. संदेश लिंगायत यांना हे काम अधिक आवडीचे वाटले. या कामात त्यांनी अधिक रस दाखवला. गावडे यांच्याकडे सलग वीस वर्ष नोकरी केल्यानंतर लिंगायत यांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा या हेतूने आपल्या जागेत आणि घराजवळ असणाऱ्या दिनेश जाधव कुटुंबाची जागा तात्पुरती घेऊन त्यामध्ये भाजीपाला आणि कडधान्य लागवडीचा प्रयोग सुरू केला. गेली आठ वर्षे ते अशी लागवड छोट्या प्रमाणात करत होते. लागवडीचा अनुभव असल्याने संदेश लिंगायत यांनी नोकरी सोडल्यानंतर लगेचच याच जागेत मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.
वेलवांगी , गोल वांगी , उडीद , कुळीथ , पावटा , विविध प्रकारच्या पालेभाज्या यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. वांग्याचे रोप त्यांनी स्वतःच तयार केले. भाजीपाला, कडधान्य याच्या विक्रीचा लिंगायत यांना चांगला अनुभव होता. वांग्याची रोपं लागवडीपासून एक ते दीड महिन्यात फळं द्यायला सुरुवात करतात. लिंगायत हे आठवड्याला सरासरी ५० किलो वांगी काढतात. संगमेश्वर येथे या वांग्यांची ८० रुपये किलो या दराने विक्री होते . वांगी आणि पालेभाजी तसेच पावटा यांना स्थानिक ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने लिंगायत यांना दुचाकीवरून संगमेश्वर येथे भाजीपाला पोहोचवणे सहज शक्य होते. पावट्याच्या शेंगांना दोनशे रुपये किलो एवढा दर मिळतो. पालेभाजी घाऊक बाजारात दहा ते पंधरा रुपये एक जुडी या दराने घेतली जाते. एकाच वेळी विविध प्रकारचा शेतमाल बाजारपेठेत नेल्याने त्याच्या विक्रीतून हाती चांगला पैसा येतो, असे संदेश लिंगायत यांनी अभिमानाने सांगितले.
लिंगायत यांची कोसुम्ब फेपडेवाडी येथे वडिलोपार्जित पाच एकर जागा आहे. त्यांच्या जागेत विहीर असून त्यावर शेती पंप बसवला असल्याने लागवडीला मुबलक पाणी देणे त्यांना सहज शक्य होते. त्यांच्या घरातील सर्वांनाच भाजीपाला लागवड आणि बागकामाची आवड असल्याने आई कुंदाताई, पत्नी संपदा, मुलगी रसिका आणि मुलगा सागर यांची त्यांना नेहमीच आवश्यक ती सर्व मदत होते. रसिका हिने एमबीएपर्यंत शिक्षण घेतलं असून ती सध्या पुणे येथे नोकरी करते. मुलगा सागर याने बारावी पर्यंत शिक्षण घेऊन आयटीआय चा कोर्स केला आणि तो देवरुख ऍडलर येथे सध्या नोकरी करत असून फावल्या वेळात वडिलांना लागवडीमध्ये मदत करत आहे.
सिद्धी ट्रस्ट मध्ये काम करत असताना ट्रस्टचे राम देशपांडे, आनंद बोंद्रे यांचे तसेच बाग कामामध्ये सुधीर गावडे यांचे आपल्याला उत्तम मार्गदर्शन झाले असल्याने आपण शेती व्यवसायाकडे वळल्याचे संदेश लिंगायत यांनी नमूद केले. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांच्या मदतीने आपण सर्व उत्पादने घेण्यावर भर देतो, असे लिंगायत यांनी सांगितले. ज्यावेळी आमच्याकडे विहीर नव्हती त्यावेळी उक्तीने पाणी लावून आपण सुरुवात केली होती. आज सर्व सुविधा उपलब्ध असल्याने केवळ मेहनत आणि जिद्द चिकाटी असेल तर , अशक्य असे काहीच नाही हे लक्षात घेऊन आपण वयाच्या ५२ व्या वर्षी शेती उत्पादनाकडे वळल्याचे लिंगायत यांनी नमूद केले.
अडचणीवर मात करण्याची गरज
शेतीमध्ये वानर आणि माकडं यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर आहे. गेली काही वर्षे रानगवेदेखील मानवी वसतीकडे मोठ्या संख्येने येत आहेत. या सर्वांचा आम्हालाही त्रास होतो. मात्र त्यांच्या उपद्रवामुळे आपण काहीच करायचे नाही तर , उदरनिर्वाह करायचा कसा ? हे लक्षात घेऊनच शेतामध्ये लागवड केल्यानंतर आपण रात्रीच्या वेळी राखण करण्यासाठी शेतामध्येच झोपतो. गवे रेडे आल्यास पिपाणी अथवा डबे वाजवून त्यांना पळवून लावतो. दिवसा पत्नी, आई या शेतीमध्ये बसून राखण करतात. परिणामी आम्ही वन्य प्राण्यांच्या त्रासातून स्वतःची सुटका करून घेत शेती मालातून भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झालो आहोत.
—संदेश लिंगायत, भाजीपाला उत्पादक शेतकरी
समूह शेतीची गरज
कोकणात ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जागा आहे तसेच जागे लगत पाण्याची मुबलक उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह शेती करणे ही काळाची गरज आहे. असे केल्यास अनेक हात मदतीसाठी उपलब्ध होतील आणि उत्पादनाची आकडेवारी वाढत जाईल. याबरोबरच शेतीचे संरक्षण करण्यासाठी वेळ विभागून घेतली तर, एकाच व्यक्तीवर राखण करण्याचा ताणही येणार नाही. समूह शेती ही कोकणात काळाची गरज ठरणार आहे. असे मत संदेश बगाराम लिंगायत यांनी व्यक्त केले आहे.

