( संगमेश्वर / प्रतिनिधी )
फुलांचे विश्व मानवाच्या विचारशक्तीच्या पलीकडचे आहे. हंगाम कोणताही असो, निसर्ग विविध प्रकारची फुले देऊन सृष्टीप्रती आपले कृतज्ञता व्यक्त करत असतो. इंग्रजीत ‘फुल’चा अर्थ मूर्ख असा असला तरी मराठीतील हाच शब्द तन – मन प्रसन्न करतो. निसर्गात सध्या बहरलेल्या’ मधु – मालती ‘ च्या वेली पाहिल्या की , एखाद्या मालतीने कोणा मधूचे मन जिंकल्यामुळेच या फुलांना या नावाने ओळखले जात असावे असेच मनात येते. निसर्गात सध्या पळस, काटेसावर म्हणजेच शाल्मली, बकुळ, नागचाफा अशी असंख्य फुलं बहरून रंगाची उधळण करत असतानाच वसंताच्या आगमनाला १५ दिवस बाकी असले तरी, मधुमालतीच्या जाळ्या हजारो फुलांनी बहरून वसंत ऋतूच्या स्वागताला सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
निसर्गाकडे नम्रतेचे हे भाव ओतप्रोत भरले असल्याची जाणीव पदोपदी होत असते. आता या मधुमालतीचेच पाहा ना , या फुलांचे अस्तित्व गंध आणि रंगातून दुरुनही जाणवते. प्रत्यक्षात फुलांजवळ गेल्यानंतर मात्र ती मान झुकवून उलटी होऊन फुलल्याचे दिसून येते. निसर्गाची मानवाप्रती केवढी कृतज्ञ भावना आहे , याची जाणीव होते. पांढऱ्या आणि गुलाबी रंगात झुपक्यांनी फुलणारी ही फुले तशी नाजूकच पण त्याचा एकत्रित गंध परिसर व्यापून टाकतो. ही फुलं अशी एकत्र पाहिली की , एकत्र कुटुंबपध्दतीचे महत्व पटते. ती एकत्र फुलतात म्हणून त्यांच्या गंधात ताकद आहे. यावरून देखील खूप काही घेण्यासारखे आहे. मधुमालतीचे वळेसर करून स्त्रिया आपल्या केसात माळत नाहीत. मात्र छोट्या मुली याचे वळेसर बनवून आपल्या डोक्यात आनंदाने माळतात.
सध्या मधुमालतीला खूप मोठा बहर असून त्यांचा गंध आसमंत धुंद करून टाकतोय. निसर्गाकडून मानवाच्या मनाला चढणारी ही धुंदी हवीहवीशी वाटणारी असते. मधुमालतीची वेल वाट मिळेल तशी विस्तारत जाते. मार्च महिना आला की , विस्तारलेली ही वेल एखाद्या नववधू सारखी सजते. पानांपेक्षाही फुले अधिक अशा मधुमालतीच्या वेली दिसल्यानंतर अरसिक व्यक्तीची पावलेही थबकल्या शिवाय राहणार नाहीत एवढे नक्की ! मार्च महिन्यात उष्णता वाढली की, निसर्ग कात टाकण्याच्या तयारीत असतो. अशावेळी नव्याने येणारी पालवी आधी फुलांचे ताटवे बहरवून नव्या आनंदाचा साज चढवण्यात मग्न असते.
(छाया : सुवर्णा भावे जोशी, चिपळूण)

