(रत्नागिरी / गुहागर प्रतिनिधी)
क्रिकेटच्या सामन्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झालेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रमुख आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात फिर्यादी पक्षाचे वकील ॲड. संकेत साळवी यांच्या भक्कम युक्तिवादाला यश मिळाले.
सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील आरे गावात ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास क्रिकेटच्या सामन्यावरून झालेल्या वादातून जयेश खोत यांच्यावर अविनाश शेटे, ओमकार बोरकर आणि साईप्रसाद बोरकर या तिघांनी लोखंडी रॉड व जांभा दगडाने बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात खोत गंभीर जखमी झाले असून त्यांना सहा दिवस रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. प्राथमिक टप्प्यात गुहागर पोलिसांनी आरोपींविरुद्ध सौम्य कलमे लावल्याने आणि तातडीने अटक न केल्याने आरोपींना चिपळूण न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यामुळे आरोपी गावात मुक्तपणे वावरत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक देत निषेध व्यक्त केला होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरणाने तालुकाभरात मोठे स्वरूप धारण केले होते.
दरम्यान, फिर्यादी जयेश खोत व त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी ॲड. संकेत साळवी यांची नियुक्ती केली. साळवी यांनी सत्र न्यायालयात मारहाणीचे छायाचित्रे, वैद्यकीय अहवाल तसेच घटनेचे गांभीर्य ठळकपणे मांडले. तपासादरम्यान लोखंडी रॉड जप्त करणे बाकी असल्याने आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा ठोस युक्तिवादही त्यांनी केला. यानंतर गुहागर पोलिसांनीही आरोपींवर गंभीर कलमे वाढवून लावली. घटनेचे गांभीर्य, फिर्यादीस झालेल्या गंभीर दुखापती आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेऊन चिपळूण सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली. तेथे झालेल्या सुनावणीत आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्राणघातक हल्ल्याचे स्वरूप अधोरेखित करण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करून उच्च न्यायालयाने प्रमुख आरोपी अविनाश शेटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, शेटे हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्याचे मोठे आव्हान गुहागर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

