(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे नुकत्याच झालेल्या १७ वर्षे वयोगट तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावत शाळेचा झेंडा अभिमानाने फडकावला.
संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वरच्या विद्यार्थिनींनी स्पर्धेत अप्रतिम खेळाचे दर्शन घडवले. जिद्द, चिकाटी आणि संघभावना यांचा सुंदर संगम साधत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अखेरीस तालुकास्तरीय पातळीवर उपविजेतेपदाचा मान पटकावून शाळेच्या परंपरेला साजेसे यश संपादन केले. केवळ मुलींचाच नव्हे, तर कसबा हायस्कूलच्या मुलांच्या संघानेही या स्पर्धेत दमदार खेळ करून स्पर्धेची रंगत वाढवली. गेल्या अनेक वर्षांपासून कसबा हायस्कूलने तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर विविध क्रीडा प्रकारांत सातत्याने यश संपादन करून स्वतःचा ठसा उमटवला आहे.
या विजयी कामगिरीसाठी कबड्डी संघांना शिक्षक श्री. एन. एस. ओकटे व श्री. यू. टी. गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपविजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंना व मार्गदर्शकांना संस्थाध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी, श्री. इब्राहिम काझी, सचिव श्री. सईद उपाद्ये, सहसचिव श्री. शौकतअली खलफे, खजिनदार श्री. शिकुर गैबी यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्राचार्य श्री. एच. जी. शेख, पर्यवेक्षक श्री. एस. ए. पटेल, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

