(देवळे / प्रकाश चाळके)
सध्या ग्रामीण भागात एक वेगळीच सामाजिक बदलाची लाट दिसून येत आहे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि बदलती जीवनशैली यामुळे लग्न जुळवण्याच्या पारंपरिक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. विशेषतः गावात राहणारे, चांगली कमाई करणारे, निर्व्यसनी आणि कुटुंबवत्सल तरुण असूनही त्यांना योग्य मुलगी मिळण्यात अडचणी येत आहेत.
पूर्वी सर्वच गावात ‘गावकर’ ही एक महत्त्वाची भूमिका असायची. वाडी-वस्तीवरील प्रत्येक कुटुंबाची माहिती गावकरांकडे असायची. एखाद्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जोडीदार शोधायचा असेल, तर गावकरांकडे चौकशी केली जायची. नातेसंबंध, कुटुंबाची पार्श्वभूमी, स्वभाव, व्यवहार आदी सर्व बाबी लक्षात घेऊन लग्न जुळवले जात असे. पानाची बटवी, सुपारी कातरता कातरता अनेक संसारांची जुळणी व्हायची. विशेष म्हणजे, जिथे लग्न जुळणे कठीण वाटायचे, तिथेही गावकरांच्या अनुभवामुळे आणि सूचनेमुळे योग्य तो मार्ग निघायचा.
मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिक्षणाच्या प्रसारामुळे मुली अधिक जागरूक झाल्या आहेत. त्या स्वतःच्या भविष्यासंदर्भात स्वतः विचार करू लागल्या आहेत, निर्णय घेऊ लागल्या आहेत. त्यातच मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
आज फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमांमुळे मुला-मुलींची ओळख जलद होते. संवाद, मैत्री, विचारांची देवाणघेवाण हे सर्व आधीच घडत असल्याने पारंपरिक पद्धतीला मागे टाकले जात आहे. काही वेळा या माध्यमांमुळे योग्य जोडीदार मिळतो, पण अनेकदा गैरसमज, फसवणूक किंवा चुकीचे निर्णयही घेतले जातात.
ग्रामीण भागातील अनेक मुलींच्या अपेक्षांमध्येही मोठा बदल झाला आहे. “मला शहरात राहणारा नवरा हवा”, “मुंबई-पुण्यात स्थायिक असलेला मुलगा पाहिजे” , छोटे कुटुंब पाहिजे, सरकारी नोकरी, गाडी पाहिजे अशा एक ना अनेक अपेक्षा आता सर्रास ऐकायला मिळतात. अनेकदा मुलाचा स्वभाव, सुशिक्षित कुटुंब किंवा प्रत्यक्ष उत्पन्न यापेक्षा तो शहरात राहतो हीच बाब अधिक महत्त्वाची मानली जाते. परिणामी, गावात राहणारे आणि चांगली कमाई करणारे मुलगे मागे पडत आहेत.
पूर्वी ‘चाकरमानी’ म्हणून ओळखला जाणारा तरुण आता ‘मुंबईकर’ म्हणून अधिक आकर्षणाचा विषय झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना योग्य जोडीदार मिळणे अधिक कठीण बनले आहे. आई-वडिलांनाही मुलींच्या अपेक्षांमुळे नाईलाजाने त्याच दिशेने विचार करावा लागतो.
दुसरीकडे, शहरी भागातही परिस्थिती फार वेगळी नाही. उच्चशिक्षित, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असलेल्या मुला-मुलींमध्येही ‘परफेक्ट जोडीदार’च्या अपेक्षा वाढल्यामुळे जुळणी होताना अडथळे येत आहेत. समजूतदारपणा, समायोजन आणि कुटुंबीय मूल्ये यापेक्षा वैयक्तिक अपेक्षा अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते—पूर्वी गावकर जे काम करत होते, तेच काम आता मोबाईल आणि सोशल मीडिया करत आहेत. फरक इतकाच की, गावकरांकडे अनुभव, सामाजिक जबाबदारी आणि विश्वास होता; तर मोबाईलमध्ये वेग, पर्याय आणि स्वातंत्र्य आहे.
“गावककारकी आता फक्त शिमगा आणि दसऱ्यापुरती उरली आहे” अशी चर्चा आज गावागावात ऐकायला मिळते. कारण लग्न जुळवण्याची जबाबदारी आता मोबाईलने घेतली आहे. एकूणच, तंत्रज्ञानाने जीवन सोपे केले असले तरी काही ठिकाणी पारंपरिक मूल्ये मागे पडताना दिसत आहेत. लग्न ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांची जुळणी असते. त्यामुळे आधुनिकतेसोबतच समतोल राखणे हीच आजची खरी गरज आहे.

