(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘ड्रग फ्री इंडिया’चा संदेश घेऊन निघालेल्या ‘एकता परेड राष्ट्रीय मोटारसायकल रॅली’चे रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. अमली पदार्थांच्या विळख्यापासून तरुणाईला दूर ठेवणे, व्यसनमुक्त समाजाचा संकल्प दृढ करणे आणि रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात रॅलीचे स्वागत करण्यात आले.
गुजरात येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांचे सेवन, बाळगणे, विक्री आणि तस्करी यांमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हा पोलीस दलाच्या ‘मिशन फिनिक्स’ उपक्रमाच्या माध्यमातूनही व्यसनमुक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. विशेषतः तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती मोहिमेत शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांचे प्रभावी चित्रण केले. व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीच्या आयुष्यावर होणारे विपरीत परिणाम अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीचा संदेश दिला. तरुणाईला व्यसनांच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नसून समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेचाही जागर करण्यात आला. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वेगमर्यादेचे पालन करणे, मद्य किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन न चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. अमली पदार्थमुक्त समाजाबरोबरच जबाबदार आणि सुरक्षित वाहनचालनेची संस्कृती रुजविण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
रत्नागिरी शहरासह संगमेश्वर, चिपळूण आणि खेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही रॅलीचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील प्रवासादरम्यान विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. रॅलीतील सहभागी रायडर्सनी रत्नागिरी जिल्ह्यात मिळालेले उत्स्फूर्त स्वागत, पोलीस दलाचे सहकार्य, आपुलकीची वागणूक आणि निवासाची व्यवस्था याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ‘ड्रग फ्री रत्नागिरी’, व्यसनमुक्त तरुणाई आणि सुरक्षित रस्ते हा संदेश जनमानसात रुजविण्याच्या दृष्टीने या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीच्या स्वागतासह राबविण्यात आलेले जनजागृती उपक्रम महत्त्वपूर्ण ठरले. अमली पदार्थांविरोधातील लढ्याला सामाजिक सहभागाची जोड देत सुरक्षित आणि निरोगी समाजनिर्मितीचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.


