(देवरुख / वार्ताहर)
साडवली सह्याद्रीनगर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि सौ. संगीता सुखदेव जाधव यांनी पुरस्कृत केलेल्या पाककला स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. सौ. संगीता जाधव यांच्या हस्ते फीत कापून, तर प्रो कबड्डी कोच प्रशांत सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
महिलांच्या पाककलेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत मूग हा प्रमुख घटक वापरून विविध पाककृती सादर करण्यात आल्या.
स्पर्धेचे नियोजन नेहा आखाडे, सोनाली नलावडे आणि प्राची चव्हाण यांनी केले. यावेळी प्रो कबड्डी खेळाडू सतीश खांबे, पप्पू नाखरेकर, प्रमोद सुर्वे, मोहन कनावजे, विनोद वाडकर, जितेंद्र नलावडे, अभिजित पाटील आणि अनिकेत सुर्वे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच साक्षी नाखरेकर, मनिषा पाटोळे, रतन भोपळकर, रोहिणी सावंत, मनाली कनावजे, माधुरी धामणे, सारिका भिंगार्डे आणि सुजाता घडशी यांनीही उपस्थिती दर्शवली.
स्पर्धेचे परीक्षण शरदचंद्रजी पवार कृषी अन्न तंत्रज्ञान विद्यालयाचे प्राध्यापक चोरगे सर आणि सरगर सर यांनी केले. स्पर्धेत संगीता पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रद्धा गुरव यांनी द्वितीय आणि सच्चिदा राणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली.


