(रत्नागिरी / प्रतिनिधी)
माळनाका येथे अधिकृत बसथांब्यावर प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या एसटी बसचालकाला दुचाकी आडवी लावून रस्ता अडविणे, बसमध्ये घुसून शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्यासाठी अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. तसेच बस पुढे नेण्यास मज्जाव करून शासकीय कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या रत्नागिरी आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले नागनाथ ब्रह्मदेव माळी (वय ३५, मूळ रा. कामते खुर्द, ता. मोहोळ, जि. सोलापूर; सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी ८.५५ वाजण्याच्या सुमारास माळी हे एमएच १४ बीटी ४४६२ क्रमांकाची एसटी बस रत्नागिरी बसस्थानकातून खेडशीच्या दिशेने घेऊन जात होते. माळनाका येथील हेळेकर मिठाई दुकानासमोरील अधिकृत बसथांब्यावर प्रवासी असल्याने त्यांनी इंडिकेटर देऊन बस रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. प्रवासी घेऊन बस पुढे मार्गस्थ होत असताना एमएच ०८ बीजे ८११८ क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाने बससमोर दुचाकी आडवी लावून रस्ता अडवला.
यानंतर संबंधित दुचाकीस्वाराने बसचालक माळी यांना शिवीगाळ केली. माळी हे एसटी महामंडळाची बस चालवत असून सरकारी गणवेशात कर्तव्य बजावत असल्याची माहिती असूनही त्याने बसमध्ये प्रवेश करून पुन्हा शिवीगाळ केली. तसेच मारहाण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर धावून जात बस येथून हलवायची नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बस पुढे नेण्यास मज्जाव केल्याने शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १३२, १२६(२), ३५२, ३५१(२) आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीस्वाराची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


