(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलमध्ये नुकताच आदर्श विद्यार्थी पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक नाईक यांनी केले.
या हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्षी सौ.अलका नामदेव शेट्ये यांचे स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान केला जातो. त्यामधील शैक्षणिक वर्ष 2025-26 चा पुरस्कार इयत्ता 10 वी चा विध्यार्थी कु. सार्थक सुरेश बाचरे या विद्यार्थ्याला देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण बसची शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अविनाश उर्फ भाऊ शेट्ये यांच्या हस्ते देण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अविनाश (भाऊ) शेट्ये यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली करण्यात आला. या सोहळ्यात अध्यक्षीय मनोगतातून आदर्श विद्यार्थी कसा असावा याबाबतचे विविध पैलू सांगत सार्थकने पुढे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जीवनात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून पुढे यावे अशी अपेक्षा भाऊ शेट्ये यांनी व्यक्त केली. तसेच संस्थेचे सचिव प्रसाद (बापू ) गवाणकर यांनी सार्थकच्या कलेची स्तुती करत त्याला जे. जे. आर्ट स्कूल, मुंबई येथील शिक्षणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर दानशूर व्यक्तिमत्व जयवंत कदम गुरुजी यांनी सार्थक बद्दल संस्थेच्या अनेक अपेक्षा असून तो नक्की पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सोहळ्याचे औचित्य साधून शाळेत झालेल्या शालेय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इयत्ता 10 वी मधील बालकवी श्रेयश्री लोंढे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील महिला शिक्षकांचा सन्मान जाधव सर यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष धांगडे, खजिनदार बंधू मयेकर श्रीमती मयेकर मॅडम व सागर शेट्ये सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पंडित मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री जाधव सर यांनी केले.

