(चिपळूण / रत्नागिरी)
गणपतीच्या आरतीनंतर सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर हाणामारी झाल्याची घटना नांदगाव भुवडवाडी येथे घडली. या प्रकरणात पितळी टाळाने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, पती-पत्नी दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता नांदगाव भुवडवाडी येथे फिर्यादी वैभव गणपत ठोंबरे यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी वाडीतील काही नागरिक आले होते. आरती झाल्यानंतर वैभव ठोंबरे हे सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाबाबत आरोपी क्रमांक ८ गजानन लक्ष्मण ठोंबरे आणि आरोपी क्रमांक ९ मारुती लक्ष्मण ठोंबरे यांच्याशी चर्चा करीत होते. या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून आपण समंजसपणे बोलून हा विषय सोडवू, असे फिर्यादी सांगत असताना तेथे उपस्थित असलेल्या इतर आरोपींनीही कथितरित्या हस्तक्षेप केला.
फिर्यादीच्या आरोपानुसार, आरोपी क्रमांक १ ते ९ यांनी त्यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी क्रमांक ४ संजय शंकर ठोंबरे याने हातातील पितळी टाळाने डोक्यावर मारल्याने दुखापत झाली, तर आरोपी क्रमांक ५ प्रविण गजानन ठोंबरे यानेही पितळी टाळाने पाठीवर मारल्याने दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पतीला सोडवण्यासाठी पत्नी विधी वैभव ठोंबरे पुढे आल्या. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या कपाळाला टाळ लागून दुखापत झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेत वैभव गणपत ठोंबरे (वय ३१) आणि विधी वैभव ठोंबरे (वय २८) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघेही मूळचे नांदगाव भुवडवाडी, ता. चिपळूण येथील असून सध्या ठाणे येथील आनंदनगर, कोपरी ईस्ट परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी राकेश सुरेश लाखण, सोमा जिरु लाखण, विजय शंकर ठोंबरे, संजय शंकर ठोंबरे, प्रविण गजानन ठोंबरे, किरण मास्ती ठोंबरे, प्रदीप गजानन ठोंबरे, गजानन लक्ष्मण ठोंबरे आणि मारुती लक्ष्मण ठोंबरे, सर्व रा. नांदगाव भुवडवाडी, ता. चिपळूण, यांच्याविरुद्ध सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये कारवाई सुरू केली आहे. जमिनीच्या वादातून सुरू झालेला वाद गणपतीच्या आरतीनंतर हाणामारीपर्यंत पोहोचल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.


