(जाकादेवी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचा निषेध नोंदविला.
खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. काही शिक्षकांची भविष्य निर्वाह खाती सुरू आहेत, तर काही शिक्षकांची भविष्य निर्वाह खाती बंद करण्यात आली आहेत. या प्रश्नासंदर्भात विविध विभागांच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या असून, तीन खंडपीठांनी जुनी पेन्शन देण्याचा निर्णय दिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. असे असतानाही शासन पातळीवर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेल्या सात वर्षांपासून प्रकरण सुरू असून, शासनाने सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मान्य केले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील शालेय कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी कर्मचारी तोंडाला काळे मास्क लावून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना जुन्या पेन्शनसंदर्भातील मागण्यांचे निवेदन देणार आहेत. आंदोलनादरम्यान काही सेवानिवृत्त शिक्षकांकडून इच्छामरणाची मागणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही जुन्या पेन्शनसंदर्भातील मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
२५ सप्टेंबरपर्यंत शासनाने जुन्या पेन्शनबाबत योग्य निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यस्तरीय आमरण उपोषण करण्याचा मनोदय आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला राज्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी विनाअट पाठिंबा जाहीर केला असून, प्रत्येक टप्प्यातील आंदोलनात सहभागी होण्याचे स्पष्ट केले आहे.
या निर्णायक आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेन्शनपीडित बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे समन्वयक संदेश राऊत, रत्नागिरी जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुफील पटेल, जिल्हा सचिव संदेश रहाटे आणि जिल्हा सहसचिव महेंद्र पवार यांनी केले आहे.

