(रत्नागिरी)
शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या मीटर चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले मीटर जप्त करण्यात आले आहेत.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे पाण्याचे मीटर चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. तसेच २४ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान बीएसएनएल कार्यालय परिसरातून तीन पाण्याचे मीटर चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी ६ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित साहिल संजय जाधव (वय २५, रा. फगर वठार, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने बीएसएनएल कार्यालय परिसरातील तीन पाण्याचे मीटर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर ६ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजता त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ९ हजार रुपये किमतीचे तीन पाण्याचे मीटर मेमोरँडम पंचनाम्याद्वारे जप्त केले आहेत. तसेच इतर तक्रारींमधील चोरीस गेलेले मीटर हस्तगत करण्याची कारवाईही सुरू आहे.
दरम्यान, चौकशीदरम्यान आरोपीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३४६/२०२५ (घरफोडी प्रकरण) मध्येही सहभाग असल्याची कबुली दिल्याने त्याला त्या गुन्ह्यातही वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस अंमलदार दिपक साळवी, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर आणि अमित पालवे यांनी केली.

