(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील चांदसूर्या स्टॉपजवळ आज (गुरुवार, २३ एप्रिल २०२६) रोजी सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या वाहन अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मात्र, प्रसंगावधान राखत रिक्षाचालकांनी दाखविलेल्या धाडस आणि तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयसूर्या शांताराम मांडवकर (वय ३८, रा. कापडगाव) हे अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र, या गंभीर परिस्थितीत वेळ न दवडता रिक्षाचालक आदित्य अनंत पावसकर (रा. गावडे आंबोरे) यांनी माणुसकीचा परिचय देत तत्काळ पुढाकार घेतला. पावसकर हे आपल्या रिक्षाचे पासिंग काम आटोपून रत्नागिरीत परतत होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी मांडवकर यांना आपल्या रिक्षामध्ये घेतले. यावेळी रुपेश पालकर (रा. पाली) यांनीही तत्पर सहकार्य करत आपली दुचाकी तिथेच उभी करून रिक्षामधून घेऊन तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी मांडवकर यांना दाखल केले आहे. जखमी मांडवकर यांना तातडीने अती दक्षता विभागात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आदित्य पावसकर या रिक्षाचालकानी दाखविलेल्या धाडसी आणि मानवतावादी कृतीमुळे रत्नागिरीत त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘अपघातग्रस्तांना त्वरित मदत’ हा समाजासाठी आदर्श ठरावा, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अपघातस्थळी केवळ बघ्यांची गर्दी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीत उतरून जीव वाचवण्याचा जो धाडसी प्रयत्न रिक्षाचालक आदित्य पावसकर यांनी केला, तो खऱ्या अर्थाने माणुसकीचा जिवंत प्रत्यय ठरला आहे.
अनेकदा अशा प्रसंगी लोक घाबरून किंवा गोंधळून जातात; मात्र येथे दाखविलेली तत्परता ही वेगळीच ठरली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमके कसे वागावे, याचे हे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल. वेळेचे महत्त्व ओळखत, कोणतीही औपचारिकता किंवा भीती न बाळगता तातडीने मदतीसाठी पुढे सरसावणे, हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे. या धाडस आणि तत्परतेमुळे जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळू शकले, जे अशा गंभीर परिस्थितीत अत्यंत निर्णायक ठरते. योग्य वेळी मिळालेली मदत अनेकदा जीव वाचवू शकते, याची जाणीव या कृतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

