(रत्नागिरी / प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती (रजि) यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे चैत्यभुमी दादर मुंबई येथे अभिवादन करण्यात येते. या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभुमीवर दर्शनासाठी विविध राज्यातून लाखो भीम अनुयायी दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जात असते. मुंबई महानगरपालिका प्रशासनाप्रमाणेच रत्नागिरीत योग्य नियोजनाच्या बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात बुधवारी (दिनांक १६ ऑक्टोबर २०२४) जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्याशी भंते आकाश बोधी, RPI (आठवले गट) ज्येष्ठ नेते नागसेन कांबळे, सुधाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यात महानिर्वाण दिनी दुःखाच्या दिवसाचे पालन कशा पद्धतीने करणे आवश्यक आहे याबाबत परिपूर्ण माहिती आंबेडकरी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन ही सादर करण्यात आले. या निवेदन म्हटले आहे की, चैत्यभुमीवर दर्शनासाठी आलेल्या लाखो अनुयायी यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरीता शासन आणि प्रशासनाच्या बैठकी घेऊन सोयी, सुव्यवस्था आणि त्यांना संरक्षण मिळण्यासाठी उपरोक्त समन्वय समिती आग्रही असते. या बैठकीमधील शासनाच्या सुचना व प्रशासनाचा योग्य तो आदेश सर्व समाजापर्यंत पोहचवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या अभिवादनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जातो, ही बाब अभिमानास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर मुंबई येथे रत्नागिरी जिल्हयातून हजारो अनुयायी जात असतात.
रत्नागिरी जिल्हयाच्या ठिकाणी आणि जिल्हयातील (मंडणगड ते राजापूर) अशा विविध ठिकाणी हा कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजलेपासून ६ डिसेंबर रात्री पर्यंत होत असतो. सदरचा अभिवादन कार्यक्रम जिल्हयात सुस्थितीत व्हावा याकरीता आपल्या अध्यक्षतेखाली आपल्या दालनात जिल्हयातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व खात्याचे प्रशासकिय अधिकारी यांच्या समवेत बैठक होणे अगत्याचे आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना बैठकीचे आयोजन करण्याबाबत आदेशित केले आहे.