(न्यूयॉर्क / वॉशिंग्टन)
इराणसोबत वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन संकटावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. रशियन तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारताला तात्पुरत्या स्वरुपात ३० दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार भारताला सध्या समुद्रात उभ्या असलेल्या रशियन तेल टँकरची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे भारतावरील इंधन संकट तूर्तास टळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता राखण्यासाठी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. बेसेंट म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणामुळे अमेरिकेचे तेल आणि वायू उत्पादन सध्या उच्चांकी पातळीवर आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी भारतीय रिफायनरींना रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती मुभा देण्यात आली आहे. पूर्ण विचार करून हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ही सवलत फक्त अशा व्यवहारांसाठी आहे जे तेल आधीच समुद्रात वाहतुकीदरम्यान अडकलेले आहे. त्यामुळे रशियन सरकारला यातून कोणताही मोठा आर्थिक फायदा होणार नाही, असा दावा बेसेंट यांनी केला. सवलतीनुसार भारताला सध्या समुद्रातच उभ्या असलेल्या रशियन जहाजांकडून तेल खरेदी करता येणार आहे.
आशियाई समुद्रात ९५ लाख बॅरल तेल वेटिंगवर
अमेरिकेकडून सवलत मिळाल्यानंतर या संधीचा फायदा घेण्यासाठी भारत आता अधिक सक्रिय झाला आहे. एका अहवालानुसार भारताच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आणि आशियाई जलक्षेत्रात सध्या रशियन कच्च्या तेलाने भरलेले अनेक टँकर्स उभ्या स्थितीत आहेत. सुमारे ९५ लाख बॅरल कच्चे तेल या टँकर्समध्ये असून भारत हे तेल खरेदी करण्याचा विचार करत आहे. सध्या हे टँकर्स भारतीय सीमेजवळ असल्याने ते खरेदी केल्यास वाहतुकीचा मोठा वेळ वाचणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील खर्चही कमी होणार आहे. जगातील तिसरा मोठा तेल उपभोक्ता असलेला भारत आपल्या एकूण गरजेच्या ८८ टक्के तेल विदेशातून आयात करत असतो.

