हिंदू विवाहपरंपरेत—विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात मंगळसूत्राचा अत्यंत महत्त्वाचा मान आहे. दोन वाट्या आणि त्यांच्यामधील काळे मोती ही त्याची ओळख. हे काळे मोती केवळ सौंदर्यासाठी नसून त्यांच्यामध्ये ज्योतिषीय, अध्यात्मिक आणि संरक्षणात्मक शक्ती दडलेल्या आहेत. परंपरेनुसार काळे मोती नकारात्मक ऊर्जा शोषण्याची क्षमता बाळगतात.
मंगळसूत्राचे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैवाहिक महत्व
हिंदू धर्मानुसार मंगळसूत्र हे केवळ ‘वैवाहिक स्त्रीचे लक्षण’ नसून पती-पत्नीतील सौख्य, समृद्धी आणि संरक्षण यांचे प्रतीक आहे. त्याचे रंग काळा आणि पिवळा यांनाही धार्मिक अर्थ आहे. काही प्रदेशांत पूर्णपणे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र वापरले जाते, जे अशुभ मानले जात नाही; उलट ते अत्यंत शुभ आणि संरक्षक मानले जाते.
काळ्या मण्यांमागील ज्योतिषीय कारणे
काळे मणी कसे संरक्षण करतात?
- मंगळ (मंगळदोष) : काळे मोती मंगळ ग्रहाची तीव्र ऊर्जा शांत करतात. पती-पत्नीतील वाद, तणाव आणि उग्रता कमी होण्यास मदत मिळते.
- शनि : काळा रंग हा शनिग्र्हाचा आहे. म्हणून काळे मणी साडेसाती, ढैय्या आणि शनीच्या नकारात्मक दृष्ट प्रभावांना कमी करतात.
- राहू–केतू दृष्टदोष, काळी जादू, नकारात्मक ऊर्जा आणि भूतबाधा यापासून संरक्षण देतात. काळा रंग राहू-केतूच्या अपायकारक तरंगांना शोषून घेतो.
- अलक्ष्मी / दारिद्र्यनिवारण : परंपरेनुसार काळा रंग अशुभता, दारिद्र्य आणि अलक्ष्मीला दूर ठेवतो, तर घरात लक्ष्मीची स्थिरता वाढवतो.
- सौभाग्य अलंकार : मंगळसूत्र हा महिलेचा सौभाग्य अलंकार आहे. तेव्हा वैवाहिक जीवनावर कोणाची वाईट नजर पडू नये, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मंगळसूत्रात काळे मणी असतात अशी देखील मान्यता आहे.
काळ्या रंगाचे मोती हे भगवान शंकराचे प्रतीक असल्याचे मानले जाते. जेव्हा विवाहित स्त्री काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालते तेव्हा तिला आणि तिच्या पतीला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. म्हणूनच मंगळसूत्रातील काळे मणी हे स्त्रीसाठी एक शक्तिशाली आध्यात्मिक कवच मानले जातात. कालांतराने मंगळसूत्रातील दोन वाट्यांची जागा पेंडंट्सने घेतली. परंतु मंगळसूत्रातील काळ्या मण्यांना अजूनही तितकेच महत्व आहे. काळ्या मण्यांशिवाय मंगळसूत्र अपूर्ण मानलं जात.
मंगळसूत्रात सोने का आवश्यक?
सोने हे गुरू ग्रहाचे प्रतीक आहे. गुरू हा ज्ञान, समृद्धी, सौभाग्य आणि कुटुंबाची स्थिरता दर्शवतो. म्हणून मंगळसूत्रात सोन्याचा समावेश केला जातो, ज्यामुळे वैवाहिक जीवनावर गुरूचा शुभ प्रभाव पडतो. आयुर्वेदानुसारही सोन्याचे स्पर्श शरीरातील तणाव कमी करतो आणि मानसिक स्थिरता वाढवतो. सोन्याचे उपचारात्मक गुण महिलांना शारीरिक-मानसिक आरोग्य सांभाळण्यास मदत करतात.
मंगळसूत्रात काळे मणी का आवश्यक?
ज्योतिषानुसार शुद्ध सोने कधीही थेट शरीरावर धारण करणे योग्य नाही. ते नेहमी अन्य धातू किंवा पदार्थासोबत असले तरच परिणाम सकारात्मक राहतात. म्हणूनच सोन्यासोबत काळ्या मण्यांचा उपयोग केला जातो.
काळे मणी राहूच्या नकारात्मक प्रभावांना कमी करतात, शनिच्या अडथळ्यांपासून संरक्षण करतात, तसेच हे भगवान शिवाचे प्रतीक मानले जातात. काळ्या मण्यांचे मंगळसूत्र परिधान केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद पती-पत्नीवर राहतात, अशी मान्यता आहे.

