(मुंबई)
‘बँक’ हा शब्द आपल्या दैनंदिन आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग बनला आहे की, दिवसातून एकदा तरी तो आपल्या तोंडातून बाहेर पडतोच. पगार जमा झाला का, बँकेत पैसे भरायचे आहेत, एटीएममधून पैसे काढायचे आहेत, ऑनलाइन व्यवहार करायचा आहे, कर्ज घ्यायचं आहे… अशा अनेक गोष्टींमध्ये ‘बँक’ हा शब्द सतत वापरला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ‘बँक’ला मराठीत नेमकं काय म्हणतात?
आश्चर्याची बाब म्हणजे, जवळपास 99 टक्के लोकांना याचं उत्तर माहिती नसतं. अगदी अनेक सुशिक्षित लोक, विद्यार्थी, बँक कर्मचारी किंवा सरकारी सेवेत असलेल्यांनाही याबाबत माहिती नसते.
बँकेला मराठीत काय म्हणतात?
‘बँक’ या शब्दाला मराठीत “अधिकोष” असे म्हणतात. हा शब्द मराठी शब्दकोशात अधिकृतपणे वापरला जातो. हिंदी भाषेतही बँकेसाठी “अधिकोष” किंवा “कोषागार” असे शब्द वापरले जातात. मात्र व्यवहारात आणि बोलण्यात हा शब्द फारसा वापरला जात नाही. कारण ‘बँक’ हा शब्द छोटा, सोपा आणि सर्वांना परिचित असल्याने तोच जास्त वापरला जातो.
‘अधिकोष’ शब्दाचा अर्थ काय?
‘अधिकोष’ या शब्दाचा अर्थ असा आर्थिक साठा किंवा निधी जिथे पैसे सुरक्षित ठेवले जातात आणि आर्थिक व्यवहार केले जातात. म्हणजेच, लोकांचे पैसे जमा करून त्याचे व्यवस्थापन करणारी संस्था. आजच्या काळात बँक केवळ पैसे ठेवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. बचत खाते, कर्ज, विमा, ऑनलाइन व्यवहार, यूपीआय, नेट बँकिंग, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड, शेतकरी योजना, सरकारी अनुदान अशा असंख्य सेवा बँकांमार्फत दिल्या जातात.
आज प्रत्येकासाठी बँक खाते गरजेचे
पूर्वी फक्त नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसायिक लोकांकडे बँक खाते असायचे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक, अगदी लहान मुलांच्या नावानेही बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात जमा होतात. ऑनलाइन खरेदीपासून वीज बिल भरण्यापर्यंत जवळपास प्रत्येक व्यवहारासाठी बँक खाते आवश्यक झाले आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे बँकिंग सेवा आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.
इंग्रजी शब्द आपल्या भाषेचा भाग कसे बनले?
‘बँक’ हा शब्द मूळ इंग्रजी असला तरी तो इतका रूळला आहे की, तो आता मराठीचाच शब्द वाटतो. असे अनेक शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात वापरले जातात.
उदाहरणार्थ हॉस्पिटल, पेन, जीन्स, बॅट, मोबाइल, ट्रेन, बस किंवा टेबल असो हे सर्व शब्द इंग्रजी भाषेतून आले असले तरी आता ते मराठी आणि हिंदी भाषेत सहजपणे मिसळले आहेत.
भाषा बदलते, शब्दही बदलतात
भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. काळानुसार काही शब्द वापरातून जातात तर काही नवीन शब्द भाषेत येतात. त्यामुळे अनेक इंग्रजी शब्द स्थानिक भाषांमध्ये इतके मिसळले आहेत की त्यांचे मूळ स्वरूप लोक विसरून जातात. ‘अधिकोष’ हा शब्द अधिकृत आणि भाषिक दृष्ट्या योग्य असला तरी सामान्य बोलण्यात ‘बँक’ हा शब्दच अधिक लोकप्रिय राहिला आहे. मात्र अशा शब्दांची माहिती असणे म्हणजे आपल्या भाषेच्या समृद्धीची जाणीव होणे होय. त्यामुळे दैनंदिन वापरातील अशा शब्दांचे मूळ आणि त्यांचे मराठी पर्याय जाणून घेणेही तितकेच रंजक ठरते.

