( मुंबई )
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे खासगी शाळेच्या व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला. या घटनेची दखल घेत राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना स्वतंत्र परवाना देण्याचे निर्देश दिले. तसेच परवान्याशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने आढळल्यास ती जप्त करण्याची कारवाई करावी, असे स्पष्ट आदेशही त्यांनी दिले.
अंबरनाथमधील घटनेची पार्श्वभूमी
अंबरनाथ येथील एका खासगी इंग्रजी शाळेच्या व्हॅनमध्ये 7 जुलै 2025 रोजी काही विद्यार्थी प्रवास करत असताना दोन विद्यार्थी खाली पडून जखमी झाले होते. हे वाहन संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी खासगीरित्या लावलेले असल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर पोलिसांनी त्याच दिवशी गुन्हा दाखल केला, तर दुसऱ्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित वाहनावर कारवाई केली.
या घटनेवरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करत रईस शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. या चर्चेत अभिमन्यू पवार, विठ्ठल लंघे, नाना पटोले आणि संजय मेश्राम यांनीही सहभाग घेतला.
शालेय वाहतुकीसाठी कडक अटी
या चर्चेनंतर राहुल नार्वेकर यांनी शिक्षण आणि परिवहन विभागाला संयुक्तपणे जबाबदारी घेण्याचे निर्देश दिले. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवाना देताना सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली आणि इतर सुरक्षा अटी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
राज्यभर विशेष तपासणी मोहीम
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यभर शालेय वाहतुकीच्या नियमांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले. शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांची पडताळणी, बसमध्ये जीपीएस प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सेवकाची नियुक्ती, वाहतूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि चालकांनी मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन केलेले नसल्याची पोलिसांकडून तपासणी अशा अटी बंधनकारक केल्या आहेत.
शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांच्या संयुक्त कारवाईतून शालेय वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यात येईल, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

