(छत्रपती संभाजीनगर)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही लाच शेतजमिनीचा वर्ग २ वरून वर्ग १ मध्ये बदलण्यासाठी मागितली गेली होती. विशेष म्हणजे, खिरोळकर यांनी याआधीच तक्रारदाराकडून २३ लाख रुपये घेतले होते आणि त्यानंतर आणखी १८ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी ५ लाख रुपये घेताना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली जात असताना दोघेही ACB च्या जाळ्यात अडकले.
या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. लाचप्रकरणातील अलीकडील घटनांची मालिका पाहता, ग्रामसेवक, तहसीलदार, महिला क्रीडा अधिकारी यांच्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे.
घर झडतीत तब्बल ६७ लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त
खिरोळकर यांच्या निवासस्थानी ACB ने छापा टाकल्यानंतर तब्बल ६७ लाख ४५ हजार ३०८ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, सोनं आणि चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील:
-
रोख रक्कम – ₹13,06,380
-
सोन्याचे दागिने – 589 ग्रॅम (सुमारे 59 तोळे), अंदाजे किंमत ₹50,99,583
-
चांदीचे दागिने – 3 किलो 553 ग्रॅम, किंमत ₹3,39,345
एकूण मालमत्ता जप्त – ₹67,45,308
या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय प्रामाणिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास एसीबीमार्फत सुरू असून, लवकरच अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.