( खेड )
खेड तालुक्यातील भरणे येथील जाधववाडीजवळ चोरथी नदीच्या पात्रातील ओझरडोह येथे पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवेंद्र दिलीप राणे (रा. तळशी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद १६ मे २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली. शिवसेनेचे खवटी विभागाचे विभाग प्रमुख श्री.दिलीप राणे यांचे देवेंद्र हा चिरंजीव होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यासअसलेला देवेंद्र हा काही दिवसांपूर्वीच गावी आला होता. दरम्यान, देवेंद्र आपल्या मित्रांसोबत ओझरडोह येथे पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना सूर मारण्याच्या प्रयत्नात त्याच्या डोक्यावर अज्ञात वस्तूचा जोरदार आघात झाला. त्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला. त्याला तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.