(मुंबई)
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने मतदानाची गरज भासणार नाही. महायुतीकडून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेतील सर्वात वयोवृद्ध खासदारांच्या यादीत शरद पवार दुस-या स्थानी आहेत. ९२ वर्षांचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे सध्याचे राज्यसभेतील सर्वाधिक वयाचे खासदार आहेत. एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ३५ वर्षांचे सर्वात तरुण खासदार म्हणून पार्थ पवार यांची निवड करण्यात आली. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वाधिक वयाचे खासदार म्हणून ८५ व्या वर्षी महाविकास आघाडीने शरद पवारांना पाठिंबा दिला.
शेवटच्या क्षणी शिवसेनेचा निर्णय
राज्यसभा निवडणुकीच्या अर्जाच्या अंतिम टप्प्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिवसेनेने अखेर एकाच उमेदवाराला संधी दिली. पक्षाकडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मागासवर्गीय समाजाच्या महिला नेत्याला राज्यसभेत पाठवून एकनाथ शिंदे यांनी या निमित्ताने वेगळा संदेशही दिला. मात्र, चर्चेत असलेले रोहित टिळक यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे सात जागांसाठी सातच उमेदवार उरले आणि निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
शिवसेनेतील या निर्णयावरून काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “आता सस्पेन्स संपला आहे. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे त्यांना ‘माझी लाडकी बहीण’ म्हणतात. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न होते. जर कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी शिंदे साहेब दूर करतील.”
शरद पवारांचा अर्ज घरी जाऊन स्वीकारला
तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार स्वतः अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली. उमेदवाराला आजारपणामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने घरी जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची ही दुर्मीळ घटना ठरली.
या निवडणुकीत तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शरद पवार, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज बाद झाला तरी दुसरा वैध राहावा यासाठी ही पद्धत वापरली जाते.
सुप्रिया सुळे यांनी मानले आभार
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीबद्दल महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनीही शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.”
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवार
भाजपाचे उमेदवार
- रामदास आठवले
- विनोद तावडे
- माया चिंतामण ईवनाते
- रामराव वडकुते
शिवसेना (शिंदे गट)
- ज्योती वाघमारे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
- पार्थ पवार
महाविकास आघाडी
- शरद पवार
निवडणुकीचे गणित
राज्यसभेच्या एका जागेसाठी 37 मतांची आवश्यकता असते. सध्या महायुतीकडे सुमारे 228 आमदार असल्याने त्यांच्या सहा उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 46 आमदार असल्यामुळे त्यांना एकच जागा जिंकण्याची शक्यता आहे आणि त्या जागेसाठी शरद पवार निवडणूक लढवत आहेत.
महत्त्वाच्या तारखा
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : 5 मार्च (समाप्त)
- अर्जांची छाननी : 6 मार्च (आज)
- उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 मार्च
- मतदान (गरज पडल्यास) : 16 मार्च
- मतमोजणी : 16 मार्च सायंकाळी 5 नंतर
दरम्यान, 1967 पासून लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेल्या आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करत शरद पवार यांनी मित्रपक्षांचे आणि जनतेचे आभार मानले.
टॉप १५ सिनिअर खासदार
- देवेगौडा – ९२ वर्ष
- शरद पवार – ८५ वर्ष
- एस. कल्याणसुंदरम – ८५ वर्ष
- मल्लिकार्जुन खरगे – ८३ वर्ष
- व्ही. विजयेंद्र प्रसाद – ८३ वर्ष
- इलायाराजा – ८२ वर्ष
- चिदंबरम – ८० वर्ष
- नरेन दास गुप्ता – ८० वर्ष
- सोनिया गांधी – ७९ वर्ष
- दिग्विजय सिंह – ७९ वर्ष
- गोविंदभाई ढोलकिया – ७८ वर्ष
- जया बच्चन – ७७ वर्ष
- डॉ. धर्मस्थळ हेगडे – ७७ वर्ष
- राजेंद्र गेहलोत – ७५ वर्ष
- अब्दुल वहाब – ७५ वर्ष

