(रत्नागिरी)
रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड यांच्या वतीने चिपळूण येथे आयोजित जिल्हास्तरीय कब–बुलबुल मेळाव्यात कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरने उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेने पहिल्यांदाच या मेळाव्यात सहभाग नोंदवून थेट सहा ट्रॉफी पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
शाळेतील इयत्ता चौथीतील ६ कब विद्यार्थी विराज सावंत, भाविक चव्हाण, श्रीराज पवार, वेद नेवरेकर, देवांश गराटे आणि स्मित आंबेकर तसेच ६ बुलबुल विद्यार्थिनी ओवी आंबेकर, गार्गी आखाडे, मीरा झगडे, उर्वी कळंबाटे, क्रितिका हरचकर आणि सावी भोसले यांनी विविध स्पर्धांत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मार्गदर्शक म्हणून श्री. हणमंत ऐवळे, श्रीम. नेहा राजेशिर्के आणि श्रीम. गायत्री औघडे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांचे विशेष मार्गदर्शन या यशामागे मोलाचे ठरले.
मेळाव्यात कब गटाने शारीरिक प्रात्यक्षिक, हस्तकौशल्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तीन ट्रॉफी मिळवल्या, तर बुलबुल गटाने शारीरिक प्रात्यक्षिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत दोन ट्रॉफी पटकावल्या. यासोबतच सहभागाची एक ट्रॉफी मिळवून शाळेने एकूण सहा ट्रॉफींची कमाई केली. पहिल्याच वर्षीची ही कामगिरी सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच र. ए. सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री. मनोज पाटणकर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे मनापासून अभिनंदन केले. या यशाबद्दल सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापिका राजवाडे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

