(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश देशपांडे आता स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’मध्ये मोहनलाल मठेला या खलनायकी भूमिकेत दिसत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
राजेश देशपांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनेता म्हणून विविध भूमिकांमधून त्यांनी आपली छाप पाडली आहे. तसेच, त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेली अनेक नाटके मराठी रंगभूमीवर गाजली आहेत. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
‘अनुपमा’ ही मालिका राजन शाही यांच्या ‘डायरेक्टर्स कट’ या निर्मिती संस्थेची आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘आई कुठे काय करते’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती याच संस्थेने केली आहे. या हिंदी मालिकेत दमदार भूमिका साकारण्याची संधी लेखिका नमिता वर्तक यांच्यामुळे मिळाल्याचे राजेश देशपांडे यांनी सांगितले.
मालिकेत अनुपमाची मुख्य भूमिका साकारणाऱ्या रुपाली गांगुली यांच्याशी चांगले ट्युनिंग जुळल्यामुळे मोहनलाल मठेला ही भूमिका साकारताना खूप आनंद मिळत असल्याचेही देशपांडे यांनी नमूद केले.
मराठी रंगभूमी आणि पडद्यावरील कामगिरीनंतर हिंदी मालिकेतही आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या राजेश देशपांडे यांच्या या नव्या भूमिकेची सध्या चर्चा होत आहे. येळवण गावच्या या सुपुत्राच्या कामगिरीमुळे परिसरातूनही त्यांचे कौतुक होत आहे.


