सध्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणारी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. काही सामने श्रीलंकेत पार पडल्यानंतर आता दोन्ही उपांत्य सामने आणि अंतिम सामना भारतात होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील पहिल्या सेमीफायनल मध्ये न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव करत फायनलचं तिकीट मिळवलं. न्यूझीलंड संघाकडून फिन एलनने शतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला. तर गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला १६९ धावांवर रोखत संघाच्या विजयाचा पाया रचला. आता न्यूझीलंड संघाचा सामना ८ मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात विजेत्या संघाशी होईल.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. जे त्यांनी 9 विकेट्सनं आरामात गाठलं. यासह आता न्यूझीलंड दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी कीवी संघानं 2021 मध्ये अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. त्यात त्यांना उपविजेत्यावर समाधान मानावं लागलं होतं.
फिन एलनने अखेरच्या चेंडूवर वादळी शतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला. त्याने ३३ चेंडूंत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले. दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ८ विकेट गमावून १६९ धावा केल्या. न्यूझीलंडने १७० धावांचे लक्ष्य एका विकेट गमावून १२.५ षटकांत पूर्ण केले.
भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून आज 5 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने देशभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे. दरम्यान, या अंतिम सामन्याच्या स्थळावरून राजकीय वाद निर्माण झाला असून काँग्रेसकडून थेट टीका सुरू झाली आहे.
अहमदाबादऐवजी मुंबईत अंतिम सामना घ्या – हुसेन दलवाई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या आयोजनावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मुंबई हे क्रिकेटचं खरं माहेरघर आहे. त्यामुळे अंतिम सामना मुंबईतच व्हायला हवा. अहमदाबादमध्ये उपांत्य सामना ठीक आहे, पण अंतिम सामना तिथं असण्याची गरज नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका
दलवाई यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, “मोदीजी अनलकी असल्याचं आधीच सिद्ध झालं आहे. आपण तिथं एकदा हरलो आहोत. पुन्हा तोच अनुभव घेण्याची गरज आहे का?”
क्रिकेटसोबत राजकारणही तापलं
एकीकडे उपांत्य सामन्याचा थरार वाढत असताना, दुसरीकडे अंतिम सामन्याच्या स्थळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भारत उपांत्य फेरी जिंकून अंतिम सामन्यात पोहोचतो का, आणि हा वाद आणखी तीव्र होतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

