(संगमेश्वर /प्रतिनिधी)
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण, साधनसुविधांचा अभाव आणि अपयशांची मालिका यांवर मात करत तळवडे (ता. संगमेश्वर) येथील सुकन्या सुगंधा संतोष तिर्मल हिने महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड मिळवून आपल्या कष्टांचे चीज केले आहे. तिच्या या यशाने तळवडे गावासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, ही कामगिरी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने सुगंधाने दररोज सुमारे आठ किलोमीटरचा पायी प्रवास केला. प्रशिक्षणासाठी कोणतीही अकॅडमी उपलब्ध नसतानाही, तळवडे गाव ते टिकलेश्वर मंदिराच्या मार्गावर नियमित धावण्याचा सराव करत तिने स्वतःची तयारी केली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिने कधीही ढळू दिला नाही. अहोरात्र मेहनतीला अखेर यशाची गवसणी मिळाली. आई-वडील आणि पाच मुली असे तिर्मल कुटुंब. वडील संतोष तिर्मल यांनी ‘मुलगा नाही’ असा कोणताही न्यूनगंड न बाळगता मोलमजुरी करून पाचही मुलींना शिक्षण दिले. स्वतः पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने, तेच स्वप्न सुगंधाच्या माध्यमातून पूर्ण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. सुगंधाने तीच इच्छा वास्तवात उतरवली.
सुगंधाचे प्राथमिक शिक्षण तळवडे जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण देवरुख हायस्कूलमध्ये, तर बी.कॉम पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात झाले. ती छत्रपती शिवराय स्पोर्ट्स क्लब, देवरुखची खेळाडू असून, खो-खो खेळात तिने तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. नागपूर, नाशिक, गडचिरोली, परभणी, औरंगाबाद आणि मुंबई येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली. यासाठी तिला निखिल कोळवणकर व सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
२०१९ मध्ये मुंबई येथे झालेल्या पोलिस भरतीत सुगंधाचे नाव प्रतीक्षा यादीत लागले. त्यानंतरही ती खचली नाही. २०२४-२५ मध्ये सिंधुदुर्ग येथे झालेल्या भरतीत क्रीडा कोट्यातून ती दुसऱ्या क्रमांकावर होती; मात्र तेथेही निराशा पदरी पडली. अखेर पुणे दौड येथे ३ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले आणि ते प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत महाराष्ट्र सुरक्षा दलात तिची निवड निश्चित झाली.
या संपूर्ण प्रवासात आई-वडिलांसह सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव, प्रकाश खांडेकर, दीपक तिर्मल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुगंधाची मोठी बहीण सुचिता हिने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी सातवीतच शिक्षण अर्धवट सोडून मुंबईत घरकाम सुरू केले आणि मिळणारी रक्कम कुटुंबासाठी पाठवत राहिली. तिच्या त्यागामुळेच चारही बहिणींचे शिक्षण सुरू राहू शकले.
अपयशातून खचून न जाता पुन्हा उभे राहण्याचा संदेश देताना सुगंधा म्हणते, “कोणत्याही क्षेत्रात अपयश आले तरी निराश न होता सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वास हेच यशाचे खरे सूत्र आहे.” भविष्यात महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन पोलीस हॉकी संघातून खेळण्याचे स्वप्न असल्याचेही तिने सांगितले. तळवड्याच्या या सुकन्येच्या यशाने केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे.

