(पुणे)
पीएम किसान सन्मान निधी योजनेत कुटुंबातील एकाच सदस्याला लाभ देण्याचा नवीन निकष लागू झाल्याने २१ व्या हप्त्यात राज्यातील तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. २० व्या हप्त्याच्या तुलनेत ही मोठी घट आहे.
राज्यात २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी ९१ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता, तर २१ वा हप्ता बुधवारी (दि. १९) ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकार आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे लाभार्थी कुटुंबांची संख्या व उत्पन्न तपासत आहे, आणि याच तपासणीतून ही कपात झाल्याचे समोर आले आहे.
कुटुंबातील एकालाच लाभ; नवीन नियमाचा परिणाम
पीएम किसान योजनेनुसार पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुले मिळून ‘कुटुंब’ मानले जाते. काही कुटुंबांनी पती-पत्नी दोघांनीही स्वतंत्र नोंदणी केली होती. अशा ठिकाणी दोघांच्याही नावे जमीन असल्यास पतीचा हप्ता बंद करण्यात आला असून पत्नीचा चालू ठेवण्यात आला आहे. या नियमामुळे १९ व्या हप्त्याच्या तुलनेत २० व्या हप्त्यात राज्यातील ६० हजार शेतकरी आधीच वगळले गेले होते. १९ व्या हप्त्यात ९२ लाख ८९ हजार शेतकरी लाभार्थी होते. शेतीची विक्री, कुटुंब विभाजन यामुळे प्रत्येक हप्त्यात नवीन नोंदणी वाढत असते. २० व्या हप्त्यात ही संख्या वाढली असली तरी नवीन निकषामुळे वाढ फक्त २ हजारपर्यंतच मर्यादित राहिली.
२१ व्या हप्त्यात २.५ लाखांची घट
राज्यातील ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी आता लाभासाठी पात्र ठरले असून त्यांना मिळून १,८०८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे. मात्र, २० व्या हप्त्याच्या तुलनेत २.५ लाखांची घट झाल्याने नवीन नोंदणी नसल्यास वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांची संख्या याहूनही अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिधापत्रिका, आधार आणि प्राप्तिकर पोर्टलवरून पडताळणी
राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्राकडे पाठवल्यानंतर तिची पडताळणी आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे केली जाते. त्यानंतर ही यादी राज्याकडे परत पाठवली जाते. राज्य सरकारकडून जमीन नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधाराशी जोडणे आणि ई-KYC प्रमाणीकरण केल्यानंतर अंतिम हप्ता वाटपासाठी केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते.

