(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे उबाठा सेनेशी संबंधित ग्रामस्थ आणि महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. फणसवणे हे उबाठा सेनेचे तालुका उपप्रमुख यांचे मूळ गाव असून, जखमाता गुरववाडी, डिके वाडी आणि सोनारवाडी येथील प्रमुख ग्रामस्थ व महिला कार्यकर्त्यांनी उद्योग व पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
रत्नागिरी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार किरणजी सामंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्रजी महाडिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांचे व महिला कार्यकर्त्यांचे ना. उदय सामंत यांनी भगवा गमछा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या पक्षप्रवेशामध्ये फणसवणे गावातील जखमाता गुरववाडी, डिके वाडी आणि सोनारवाडी परिसरातील महिलांचा लक्षणीय सहभाग होता. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तसेच परिसरातील विकासकामांमुळे आपण शिवसेनेसोबत येत असल्याची भावना पक्षात प्रवेश करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कुटुंब आणि परिसराच्या विकासासाठी ना. उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. पक्षात नव्याने सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल आणि त्यांच्या स्थानिक प्रश्नांसाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फणसवणे येथील या पक्षप्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यातील आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे. उबाठा सेनेचे तालुका उपप्रमुख यांचे मूळ गाव असलेल्या फणसवणे येथेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी झाल्याने या घडामोडीकडे राजकीयदृष्ट्या लक्ष वेधले जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि उद्योग व पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत पक्षप्रवेश केल्याचे नव्याने सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात कमल गिजे, वासंती गिजे, जयवंती गिजे, संपदा महेश घोरपडे, सलोनी सु. गोरीवले, वैष्णवी वि. गोरीवले, सुनिता सि. गिजे, सुस्मिता स. गोरीवले, कलावती तु. गोरीवले, सायली स. गोरीवले, श्रध्दांजली शिंदे, सूर्यकांत गिजे, निलेश गिजे, महेश घोडपडे, रामदास गोरीवले, सचिन गोरीवले, अनंत गोरीवले, विनायक गोरीवले, तुकाराम गोरीवले, प्रविण जंगम, सुमित गोरीवले, विलास सागवेकर, सचिन जंगम, सखाराम गोरीवले, प्रतिक सागवेकर, अमूर गुरव, मनोज गुरव, रमाकांत गुरव, एकनाथ गुरव, वैभव पोमेंडकर, रविंद्र कदम, पांडुरंग शिंदे आणि संजय वरेकर आदी प्रमुख ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी रत्नागिरी आणि संगमेश्वर परिसरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच फणसवणे परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


